Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस सुवर्णा झाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली 'ही' मागणी
उत्तर सोलापूर तालुक्यात शेतीसाठी अनुदानाची मागणी
उत्तर सोलापूर : नान्नज अभयारण्यात वास्तव्याला असलेल्या रानडुकरांच्या उपद्रवामुळे नान्नजसह वडाळा, मार्डी, कारंबा, अकोलेकाटी, नरोटेवाडी आणि लगतच्या बाणेगाव, बिबीदारफळ, रानमसले आदी गावांमधील शेतीमधील उभी पिके उद्ध्वस्त होत आहेत.
तेव्हा या गावांतील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान देण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस व उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षा सुवर्णा झाडे यांनी केली.
उपमुख्यमंत्री पवार हे वडाळा येथे आले असता झाडे यांनी मागणीचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, इथला शेतकरी कधी अतिवृष्टी तरकधी दुष्काळ यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. त्यातच भर म्हणून नान्नज अभयारण्यात असलेल्या रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे ज्वारी, गहू, मका, ऊस, केळी यांसह कोणतीही पिके शेतात रानडुकरे येऊच देत नाहीत. सध्या वन विभागाच्या नागपूर कार्यालयाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.