For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्याची लढत आता ठाकरे-पवार आणि मोदींमध्ये!

06:16 AM Jan 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्याची लढत आता ठाकरे पवार आणि मोदींमध्ये
Advertisement

शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष फुटूनसुध्दा मतांची टक्केवारी वाढताना दिसत नाही, हे वास्तव महायुतीने मान्य केले नसले तरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे. म्हणूनच आठवड्यात दुसऱ्यांदा ते महाराष्ट्रात येऊन गेलेत.

Advertisement

महाराष्ट्रात सध्या उध्दव ठाकरे यांनी आपले वातावरण निर्माण केले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी जी महापत्रकार परिषद घेतली आणि त्यातून जे व्हिडिओ आणि निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या घटना दुरुस्ती संदर्भात अवगत केल्याची पोहोच दाखवून जी वक्तव्ये केली त्यातून ठाकरेंच्या बाजूच्या सहानुभूतीची जागा बदलून ती त्यांच्या व्यक्तिमत्वावर विश्वास वाढवण्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर काऊंटर अटॅक करायला जाऊन राहुल नार्वेकर पुरते फसले. त्यात शिंदेंचे प्रवत्ते आमदार शिरसाट तांत्रिक बाजू मांडायला गेले. तो बारही फुसका ठरला. महाविकास आघाडीकडे अशी प्रतिमा उंचावलेले शरद पवार होते. त्यात उध्दव ठाकरे यांची मोठी भर झाली. ज्यामुळे महाराष्ट्रात लढत सोपी राहणार नाही आणि महायुतीच्या राज्याच्या नेत्यांना हे वादळ पेलवणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. याची जाणीव चाणाक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात आधी झाली आहे. काळाराम मंदिरात सफाई त्यांनी त्यासाठीच हाती घेतली आणि सोलापूरच्या शुक्रवारच्या सभेत भावूक होण्यापूर्वी आपण नाशिकला का पोहोचलो त्याचा खुलासाही केला. ‘मोदी की गॅरंटीच’ राज्यात चालवली तर लोकसभेला काही आशा आहेत हे मोदींनी जाणल्याचे त्यांच्या शुक्रवारच्या सोलापूर दौऱ्यातून स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी जोरदार प्रदर्शन केले. राज्यात आता ठाकरे-पवार विरुद्ध मोदी अशाच सभा गाजू लागल्या तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. 2019 पासून सुरू असलेली ही झुंज आता निर्णायक होण्याची चिन्हे आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांची ताकद बऱ्यापैकी खिळखिळी करण्यात भाजपला यश मिळाले होते. आमच्या समोर तुल्यबळ उमेदवारच नाहीत असे वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. राष्ट्रवादीतील अनेकजण मनातून हार पत्करून घरात बसले होते. तेव्हा सरकारकडून मोठा घाव घातला गेला. राज्य सहकारी बँकेतून साखर कारखान्यांच्या खासगीकरणासाठी केलेल्या खेळात पॅनेलचे नेते म्हणून शरद पवार हेच जबाबदार आहेत अशा आरोपाच्या याचिकेतून एक गुन्हा दाखल केला. असा गुन्हा दाखल करुन चौकशीचा आदेश देण्याची न्यायालयीन रीत आहे. गुह्यातील रक्कम शंभर कोटीहून अधिकची असल्याने त्या आधारावरच इडी सक्रिय झाली. शरद पवार यांना चौकशीला बोलवले जाणार आणि त्यात अटकही होऊ शकते असे वातावरण निर्माण केले गेले. आता राहिलेले लोक, कारखानदार पक्ष सोडतील असा सर्वांचा अंदाज होता. (कदाचीत अजितदादा तेव्हापासून त्या विचारात असावेत.) या संकटाच्या प्रसंगाला मुरब्बी शरद पवार यांनी संधीत परावर्तीत केले. आपण चौकशीला आताच सामोरे जायला तयार आहोत. निवडणूक दौरा सुरू झाल्यावर वेळ मिळणार नाही, असे पवारांनी जाहीर केले. याचा परिणाम राज्यात व्हायचा तोच झाला आणि इडी सुध्दा ती परिस्थिती हाताळण्याबाबत गडबडून गेली. पुढे पवारांनी इतिहास रचला. जिथे 20 जागाही मिळणे कठीण तिथे ते सत्तेच्या स्पर्धेत आले. महाविकास आघाडीचा इतिहास घडला.

Advertisement

आता उध्दव ठाकरे यांनी आपली प्रतिमा तशीच बनविण्यास सुरुवात केली आहे. आपण नैतिकता म्हणून मुख्यमंत्रीपद सोडले. नार्वेकर यांचा निकाल चुकीचा आहे. निवडणूक आयोगाने आपल्यावर अन्याय करून पक्ष आणि चिन्ह शिंदे यांना दिले आणि तीच री ओढत नार्वेकर यांनी निकाल दिला हे त्यांनी व्हिडिओद्वारे दाखविले. आपली पक्षाच्या अध्यक्षपदी निवड होताना नार्वेकर शिवसेनेचे आमदार म्हणून त्या बैठकीस हजर होते. एकनाथ शिंदे यांना आपणच नेता म्हणून नियुक्त केले. ते निवडून आलेले नेतेही नाहीत तर आपण नियुक्ती केलेले आहेत. त्यांच्या निवडीला नंतर मान्यता घेण्यात आल्याचे त्यांनी दाखवून दिले. या व्हिडिओत रामदास कदम, गजानन किर्तीकर या मोठ्या नेत्यांची आणि राहुल शेवाळे या ज्युनियर बंडखोरांचीही पोलखोल झाली. लोकांचा आपण डोळ्याने काय पाहिले यावर जास्त विश्वास असतो. त्यामुळे हे व्हिडिओ चित्रण सत्ताधाऱ्यांनी आणि नार्वेकर यांनी नाकारले तरी लोकांच्या मनावर त्याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. याबाबत येणाऱ्या प्रतिक्रिया खूपच बोलक्या आहेत. ज्याचा भविष्यात मोठा प्रभाव दिसू शकतो. ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मुख्यमंत्रीपदी पुनर्स्थापना केली असती, या सर्वोच्च न्यायालयाच्या दोष दर्शनातूनही त्यांनी मुक्ती मिळवली. अर्थात बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच एक ठाम निर्णय आता उध्दव ठाकरे यांच्या खात्यातही जमा झाला आहे.  आडम मास्तर यांची स्वप्नपूर्ती

मोदी, पवार, ठाकरे या नेत्यांची जशी एक प्रतिमा आहे आणि त्याचा निवडणुकांवर परिणाम होणार आहे तसा परिणाम एका ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्याच्या बाबतीत होणार नसला तरी त्यांची दखल महाराष्ट्राला घ्यावी लागेल. आयुष्यभर ज्या कष्टकरी वर्गासाठी नरसय्या आडम मास्तर लढले त्यांची 30 हजार घरांची स्वप्नपूर्ती होऊन सोलापूर हे भारतातील श्रमिकांच्या 15 हजार पक्क्या घरांसाठी ओळखले जाणार आहे. यापूर्वी त्यांच्या पक्षाने मोदी यांच्याबद्दल वक्तव्य केले म्हणून कारवाई केली होती. यावेळी त्यांनी चूक सुधारली. मोदी आणि मास्तर हे लोकशाहीत विरुध्द टोकाचे नेते एकत्र येऊ शकतात आणि काही विधायक घडू शकते हे सोलापुरात दिसून आले. शेवटी राजकारणाचा उद्देश लोकांचे कल्याण हा असतो. मास्तर मोदींच्या सभेत भावूक झाले. गरिबांच्या घरांची कळकळ त्यांच्या भाषणातून जाणवली. या सभेत त्यांनी सोलापूरच्या श्रमिकांच्या प्रश्नांवर राज्य आणि केंद्र सरकारचे सौम्य भाषेत डोळेही उघडले. लष्कर आणि पोलीस गणवेशाचे काम सोलापूरला देण्याची मोदींना आठवण करून दिली. कोश्यारी समितीने कामगारांना मंजूर केलेली पेन्शन देण्याची मागणी केली. आयुष्य ज्या विचारांसाठी खर्ची घातले त्या विचारांशी बांधील राहूनही बरेच काही घडवता येते हे त्यांनी दाखवून दिले ही आजच्या राजकारणात खूपच सुखावह तर काही बाबींना मुरड घालावी लागते.

शिवराज काटकर

Advertisement
Tags :

.