आस्मा नदाफ यांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार
बेळगाव : आंबेवाडी येथील मराठी प्राथमिक शाळेच्या कन्नड विषयाच्या शिक्षिका आस्मा इस्माईल नदाफ उर्फ आशा एम.पोतदार यांना मंगळवारी सायंकाळी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी निपाणी, अम्मनगी व बेळगाव येथे दिलेल्या सेवेची दखल घेत राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक उपक्रमशील शिक्षिका म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
आस्मा नदाफ या मागील सतरा वर्षांपासून शिक्षण सेवा देत आहेत. सामाजिक हेतूने त्यांनी सुभाष नगर येथील शाळेमध्ये एलकेजी, युकेजी वर्ग दत्तक घेऊन वर्ग सुरू केले आहेत. गुऊवार 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून बेंगलोर येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना गौरविले जाणार आहे. मुख्यमंत्री तसेच शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांमध्ये बेळगावच्या एकमेव शिक्षिकेचा समावेश आहे.
दरम्यान, शहापूर येथील चिंतामणराव पदवीपूर्व महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आणि रायबाग येथील न्यू संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक अण्णप्पा सदाशिव कुंभार यांचीही 2024-25 सालातील राज्यस्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाने तीन प्राचार्य आणि आठ प्राध्यापकांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.