राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुण्यात रंगणार
यंदा प्रथमच 18 वर्षांखालील मुले-मुलींच्या स्पर्धेचे आयोजन
वृत्तसंस्था/ पुणे
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली 18 वर्षांखालील मुले आणि मुली यांची राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुण्यात रंगणार आहे. शिवशक्ती महिला मंडळाच्या यजमानपदाखाली होणाऱ्या ही स्पर्धा दि. 14 ते 18 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.
ही स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 25 जिह्यांचे एकूण 31 संघ सहभागी होणार आहेत. या निवड स्पर्धेतून निवडण्यात आलेला संघ हरिद्वार (उत्तर प्रदेश) येथे 28 जून ते 01 जुलै 2025 पासून होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. स्पर्धेचा उद्घाटन समारंभ 14 जून रोजी सायंकाळी 6 वाजता शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेसाठी 25 जिह्यांतील सुमारे 1,000 खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापक सहभागी होणार असून, 900 हून अधिक खेळाडूंसाठी निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. बालेवाडी येथील बंदिस्त क्रीडा संकुलातील चार मैदाने आणि इतर क्रीडांगणांवर ही स्पर्धा होणार आहे.