भव्य दिव्य सोहळ्याने पॅरालिम्पिकला प्रारंभ
भारताकडून भाग्यश्री जाधव, सुमीत अँटिल ध्वजवाहक, नयनरम्य सोहळ्याने वेधले जगाचे लक्ष
वृत्तसंस्था/पॅरिस
फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेला शानदार सुरुवात झाली. भारतासह 167 देशांतील खेळाडूंनी परेडमध्ये प्रचंड उत्साह दाखवला. उद्घाटन सोहळा सिटी ऑफ लाईटमधील प्लेस डे ला कॉन्कॉर्डवर आयोजित करण्यात आला होता. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पंरपरेला फाटा देत ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेचा हा सोहळा स्टेडियमच्या बाहेर रंगला. भालाफेकपटू सुमित अंतिल आणि महाराष्ट्राची पॅरा अॅथलिट भाग्यश्री जाधव हे भारताचे ध्वजवाहक होते.
उद्घाटन समारंभात हजारो खेळाडूंनी परेड ऑफ नेशन्समध्ये भाग घेतला. परेड चॅम्प्स-एलिसीस अव्हेन्यू येथून सुरू झाली आणि प्लेस दे ला कॉन्कॉर्डकडे निघाली. या ऐतिहासिक चौकाच्या आजूबाजूला बांधलेल्या स्टँडवरून सुमारे 50 हजार लोकांनी हा सोहळा पाहिला. परेड ऑफ नेशन्समध्ये भारतीय खेळाडू पारंपरिक पोशाखात दिसले. भालाफेकपटू सुमित अँटिल आणि शॉटपुट खेळाडू भाग्यश्री जाधव यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर
पॅरिस शहराने पुन्हा एकदा आपली चमक दाखवली. बुधवारी रात्री झालेला हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती. भव्यदिव्य सोहळ्याने पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली. दरम्यान, यंदाची पॅरालिम्पिक स्पर्धा 28 ऑगस्टपासून 8 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. 11 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 22 खेळामध्ये 549 पदकासाठी झुंज लागेल. स्पर्धेत 169 देशातील साडेचार हजारहून अधिक खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील.
भारताचे 84 खेळाडू पदकासाठी उतरणार
यंदाच्या स्पर्धेत भारताचे एकूण 84 पॅरा अॅथलीट सहभागी होणार आहेत. हे सर्व खेळाडू 12 विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताकडून 54 खेळाडूंचा संघ गेला होता, ज्यामध्ये एकूण 19 पदके जिंकण्यात यश मिळाले होते. यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्यपदके होती. भारत यावेळी 12 खेळांमध्ये सहभागी होत आहे. तीन वर्षांनंतर, सुवर्णपदकांची संख्या दुहेरी अंकात नेण्याचे आणि एकूण 25 हून अधिक पदके जिंकण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
तुलसीमती - नितेशची विजयी सलामी
2024 च्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात भारताच्या नितेश कुमार आणि तुलसीमती मुरुगुसेन यांनी मिश्र दुहेरीमध्ये आपल्या मोहीमेला शानदार विजयाने प्रारंभ केला. गुरुवारी नितेश आणि तुलसीमती यांनी पहिल्या फेरीतील सामन्यात सुहास यतिराज आणि पालक कोहली यांचा पराभव केला.
मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात नितेश आणि तुलसीमती यांनी भारताच्या सुहास यतिराज व पालक कोहली यांचा 21-14, 21-17 अशा सरळ गेम्स्मध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. नितेश आणि तुलसीमती यांचा अ गटात समावेश असून आता ही जोडी प्राथमिक फेरीत आणखीन दोन सामने खेळणार आहे. या क्रीडा प्रकारात महिलांच्या एकेरी एस.एल.3 गटातील पहिल्याच फेरीतील सामन्यात भारताच्या मानसी जोशी आणि मनदीप कौर यांना पराभव पत्करावा लागला. 2019 च्या विश्व पॅरा
चॅम्पियनशीप स्पर्धेत मानसीने सुवर्णपदक मिळविले होते. पण यावेळी तिला पॅराऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्याच फेरीतील सामन्यात इंडोनेशियाच्या सीयाकुरोने 16-21, 21-13, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव केला. महिला एकेरीच्या ब गटातील एका सामन्यात नायजेरीयाच्या मरियम बोलाजीने भारताच्या मनदीपचा 21-8, 21-14 असा पराभव केला. 2020 साली झालेल्या टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण 19 पदकांची कमाई केली होती. त्यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कास्य पदकांचा समावेश होता.