ईएसआय हॉस्पिटलचे काम सुरू करा
राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांची ईएसआय अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : शहरातील राज्य कामगार विमा निगमचे 50 खाटांचे रुग्णालय जमीनदोस्त करून केंद्रीय कामगार विमा निगमअंतर्गत 100 खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी सुमारे 152 कोटी अनुदानाची निविदा प्रक्रिया काही महिन्यांपूर्वी राबविण्यात आली होती. पण प्रत्यक्षात कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. रुग्णालयाचे काम त्वरित सुरू करून कामगारांना सोयीचे करून द्यावे, अशी मागणी राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी राज्य कामगार विमा योजनेच्या प्रादेशिक संचालकांकडे केली. येथील खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयात बुधवार दि. 13 रोजी झालेल्या राज्य कामगार विमा निगम अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये इरण्णा कडाडी बोलत होते. राज्य कामगार विमा निगमच्या रुग्णालयाचे स्थलांतर करण्यासाठी मागील चार वर्षांपासून आपण प्रयत्न करीत आहोत. संबंधित मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नूतन रुग्णालय उभारण्यासाठी मागणी केली आहे.
सध्या या रुग्णालयात सेवा बजावत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बेळगाव येथील राज्य कामगार विमा योजना चिकित्सालय व नजीकच्या हुबळी, दांडेली रुग्णालयात तात्पुरती नियुक्ती करावी. इमारत जमीनदोस्त केल्यास नूतन इमारत बांधकाम त्वरित हाती घेऊन पूर्ण करता येणे शक्य होईल, असे आपण कामगार खात्याच्या सचिवांना कळविले आहे, असे कडाडी यांनी सांगितले. व्हीओटीसी होनगा रुग्णालयाचे इमारत मालक आपली इमारत ईएसआय रुग्णालयाला देण्यास राजी आहेत. त्यामुळे सध्या असलेले कामगार योजनेचे रुग्णालय स्थलांतर करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील उपप्रादेशिक कार्यालय बेळगाव जिल्हा केंद्रस्थानी, विजापूर, बागलकोट व कारवार जिल्हा उपप्रादेशिक कार्यालयांशी संलग्न असावेत, यासाठीही प्रादेशिक संचालकांना सूचना केली आहे, असेही कडाडी यांनी सांगितले. राज्य कामगार विमा निगमचे प्रादेशिक संचालक डॉ. व्ही. वरदराजू, विभागीय संचालक व अतिरिक्त आयुक्त रेणुका प्रसाद टी., कार्यकारी अभियंता विनोद कर्कवाल, उपप्रांत कार्यालयाचे उपसंचालक रघुरामन के., राज्य कामगार विमा रुग्णालयाचे बेळगाव वैद्यकीय अधीक्षक मंजुनाथ कळसण्णवर यांसह अन्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.