प्रत्येक गावात हनुमान चाळीसा पठण सुरू करा
जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील
शौर्य सप्ताहांतर्गत बजरंग दलाचे शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन
कोल्हापूर
बजरंग दलाच्या ‘सेवा, सुरक्षा आणि संस्कार’ या त्रिसुत्राचे पालन करा, जिल्ह्यातील प्रत्येक गावात हनुमान चाळीसा पठण सुरू करा, संघटन मजबूत करा, असे आवाहन विश्व हिंदू परिषदचे बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी केले.
विश्व हिंदू परिषद (बजरंग दल) संपूर्ण भारतात दरवर्षी गीता जयंती निमित्त शौर्य साप्ताह कार्यक्रम होत असतात. यानिमित्ताने बजरंग दलाच्यावतीने कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून रविवारी संचलन करण्यात आले. मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथून संचलनाला सुरवात झाली. सकाळपासूनच बजरंग दलाचे जिल्ह्यातून कार्यकर्ते येथे जमा होत होते. दुपारी 12 च्या सुमारास संचलनाला सुरवात झाली.
संचलनामध्ये आणलेली हनुमानाची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. बजरंग दलाचे 200 हून अधिक कार्यकर्त हातात भगवे ध्वज, भगव्या टोप्या घालून सहभागी झाले होते. ‘जय श्रीराम, जय श्रीराम’, ‘जय शिवाजी’, ‘देश की रक्षा कोण करेंगे बजरंग दल.. बजरंग दल’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. ‘शिवबानी सांगावा धडल्या... देशासाठी लढ्याचे. धर्मासाठी झुंजायचे’ अशी प्रेरणा गीतही गाण्यात आली. मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी चौक मार्गे दसरा चौकात आल्यानंतर संचलनाची सांगता झाली.
यावेळी जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील म्हणाले, बजरंग दलाची त्रिसुत्र असून याचे पालन सर्वांनी केले पाहिजे. बजरंग दलातील सदस्यांनी आठवड्यातून एक तास दलाच्या कामासाठी दिला पाहिजे. अद्यपी लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे समाजात जनजागृत्ती करावी. पुढील तीन महिन्यांत प्रत्येक गावामध्ये हनुमान चाळीसा पठण सुरू करावे. यावेळी विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाचे अनिल दिंडे, विजय पाटील, उत्तम सांडुग, निलेश शिंदे, आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील 1300 गावांत साप्तहिक बैठक घ्या
जिल्ह्यात लहान मोठी अशी 1300 गावे असून या ठिकाणी बजरंग दलाचे संघटन मजबूत करा. या सर्व गावांमध्ये साप्ताहिक बैठका घ्या, आपली संस्कृती जपली पाहिजे. त्यासाठी लहान मुलांना हनुमान चाळीसा पाठ झाले पाहिजे, असे आवाहनही पुंदन पाटील यांनी केले.