सहामाही परीक्षांचा श्रीगणेशा
पाल्यांना शाळांमध्ये पोहोचविण्यासाठी पालकांची गर्दी
बेळगाव : दसऱ्याची सुटी जवळ आल्याने त्यापूर्वी सहामाही परीक्षांना सुरुवात झाली आहे. सोमवारपासून पाचवी ते दहावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी शारीरिक शिक्षण, कला व कार्यानुभव या विषयांचे पेपर पार पडले. त्यामुळे सकाळी विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी शाळांसमोर पालकांची गर्दी झाली होती. शालेय शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सोमवारपासून परीक्षांना प्रारंभ झाला. चार दिवसांपूर्वी जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून प्राथमिक व माध्यमिक विभागाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षांना प्रारंभ झाला. शिक्षण विभागाने पहिली ते नववीपर्यंतच्या प्रश्नपत्रिका शाळांनीच निश्चित कराव्यात व त्या छपाई करून विद्यार्थ्यांना द्याव्यात, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार शाळांनी प्रश्नपत्रिका तयार करून छपाईसाठी दिल्या आहेत. परीक्षा बोर्डाने दहावीच्या प्रश्नपत्रिका मुख्याध्यापकांच्या लॉगईन आयडीवर उपलब्ध करून दिल्या आहेत. मुख्याध्यापकांनी आपल्या लॉगईन आयडीवर जाऊन माहिती भरल्यानंतर त्यांना ओटीपी क्रमांक येतो. तो दिल्यानंतरच प्रश्नपत्रिका उपलब्ध होत आहेत. या प्रश्नपत्रिका शाळांनाच छपाई करून घ्याव्या लागणार आहेत.
प्राथमिक विभागाच्या परीक्षा बुधवारपासून
गुरुवार दि. 3 ऑक्टोबरपासून दसऱ्याच्या सुटीला प्रारंभ होत आहे. त्यापूर्वी परीक्षा घेण्यासाठी शाळांची धडपड सुरू आहे. 30 सप्टेंबरपूर्वी परीक्षा पूर्ण व्हाव्यात, यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. बुधवार दि. 25 पासून पहिली ते पाचवीपर्यंतच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.