For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात लालूप्रसादच मुख्य सूत्रधार

06:35 AM Sep 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘लँड फॉर जॉब’ प्रकरणात लालूप्रसादच मुख्य सूत्रधार
Advertisement

पुरवणी आरोपपत्रात ईडीचा दावा : कुटुंबियांचाही सहभाग : रेल्वेतील नोकरीच्या बदल्यात भूखंड लाटल्याचे स्पष्ट

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली/पाटणा

जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याच्या प्रकरणात (लँड फॉर जॉब) राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या ईडीने शुक्रवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचाच मुख्य सूत्रधार असा उल्लेख करण्यात आला आहे.

Advertisement

तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या नावाखाली लोकांकडून लाच म्हणून भूखंड घेतले होते. ईडीच्या आरोपपत्रानंतर लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत आणखी वाढ होऊ शकते. रेल्वेतील नोकरी आणि त्या बदल्यात जमिनीचे व्यवहार लालू यादव स्वत: ठरवायचे, असा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या माध्यमातून घेतलेल्या जमिनीवर लालू यादव कुटुंबीयांचा ताबा असल्याचा आरोप आहे. गुन्ह्याद्वारे मिळविलेल्या जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचे नियंत्रण आहे, परंतु जमिनीचा त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाशी थेट संबंध नाही, असे भासवण्यात येत असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच या व्यवहारामध्ये अनेक बनावट कंपन्या उघडून त्यांच्या नावावर जमिनींची नोंद करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. रेल्वेत नोकरी द्यायची आणि लाच म्हणून जमीन घ्यायची की नाही हे लालू प्रसाद यादव स्वत: ठरवत असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. यासंबंधीची बोलणी हाताळताना त्याचे कुटुंबीय आणि त्यांचा जवळचा मित्र अमित कात्याल त्याला साथ देत होता, असेही ईडीने म्हटले आहे.

कवडीमोल भावाने जमीन खरेदी

लाच म्हणून घेतलेले अनेक भूखंड लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या नावे असल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने केला आहे. हे भूखंड कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आले. गुन्ह्यातून मिळालेल्या कमाईतून लालूंच्या कुटुंबाला आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांना महुआ बाग, पाटणा येथे सुमारे 7 भूखंड मिळाले. यातील चार भूखंड प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे राबडीदेवींशी संबंधित असल्याचा दावा ईडीने केला आहे. या सर्व भूखंडांचे व्यवहार कवडीमोल भावात झाल्याचेही उघड झाले आहे.

भोला यादव यांच्या वक्तव्याचा हवाला

ईडीने आरोपपत्रात पुढे दावा केला आहे की भोला यादव यांनी पीएमएलएच्या कलम 50 अंतर्गत दिलेल्या आपल्या वक्तव्यात आपण तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचे ओएसडी असल्याचे कबूल केले आहे. याशिवाय, लालू यादव यांच्या पाटण्यातील निवासस्थानी गिफ्ट डीड झाल्याचे भोला यादव यांनी सांगितले. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या विविध आदेशांद्वारे तसेच सीबीआयच्या आरोपपत्राने भोला यादव यांची रेल्वेमंत्र्यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

न्यायालयाकडून 7 ऑक्टोबरला पाचारण

राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने अलिकडेच लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्यासह या प्रकरणात आरोप असलेल्या इतरांना समन्स बजावले. न्यायालयाने तेजप्रताप यादव यांनाही समन्स बजावले आहे. न्यायालयाने अखिलेश्वर सिंह आणि त्यांची पत्नी किरण देवी यांनाही पाचारण केले आहे. त्यांना 7 ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपींविऊद्ध पुढील कारवाई करण्यासाठी आवश्यक पुरावे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तेजप्रताप यादव यांना पहिल्यांदाच लँड फॉर जॉब प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.