For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिकोडी-अथणीत चारा छावण्यांना प्रारंभ

11:06 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
चिकोडी अथणीत चारा छावण्यांना प्रारंभ
Advertisement

चारा संकट दूर करण्यासाठी प्रयत्न : दुष्काळी भागात चारा बँकचा आधार : पशुपालकांना दिलासा

Advertisement

बेळगाव : दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा टंचाई भासू नये यासाठी चिकोडी आणि अथणी तालुक्यात चारा बँक सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चाराविना अडचणीत सापडलेल्या पशुपालकांना दिलासा मिळाला आहे. पशुपालकांना दोन रुपये किलो प्रमाणे एका जनावराला सहा किलो सुका चारा वितरीत केला जात आहे. शिवाय ज्या ठिकाणी चारा टंचाई निर्माण होणार आहे, त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती पशुसंगोपन खात्याने दिली आहे. पशुसंगोपन खात्याने जिल्ह्यात 13 लाख मेट्रिक टन चारासाठी शिल्लक असल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात अथणी, चिकोडी, रायबाग तालुक्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी चारा बँक स्थापन करून चारा पुरविला जात आहे. पावसाअभावी यंदा चारा संकट गडद होवू लागले आहे. नदी, नाले, तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीत घट होवू लागली आहे. त्यामुळे नवीन चारा निर्मिती थांबली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंगोपनची धडपड सुरू झाली आहे.

372 मेट्रिक टन चारासाठी उपलब्ध करून देणार

Advertisement

गतवर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. परिणामी चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. एका ट्रॉलीसाठी 20 ते 25 हजार रुपये मोजावे लागत आहेत. चाऱ्याविना काही पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ येवू लागली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक तालुक्यातील 50 लाखांच्या निधीतून 372 मेट्रिक टन चारासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

एका आठवड्यासाठी 50 किलो चारा

दिवसेंदिवस उन्हाच्या झळा अधिक तीव्र होवू लागल्या आहेत. त्यामुळे ओला चारासाठा कमी होत आहे. त्यामुळे पशुसंगोपन खात्याकडून चाऱ्याची तजवीज करण्यात आली आहे. पशुपालकांना दोन रुपये किलो प्रमाणे एका जनावराला सहा किलो चारा पुरविला जात आहे. एका आठवड्यासाठी 50 किलो चारा दिला जात आहे. जिल्ह्यात 16 लाखांहून अधिक जनवारांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल आदींचा समावेश आहे. मोठ्या जनावरांना दैनंदिन 20 ते 30 किलो चाऱ्याची गरज भासते. याची दखल घेवून प्रशासनामार्फत चारा पुरविण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.

पशुसंगोपन खात्यामार्फत चारा छावण्यांची तयारी

जिल्ह्यात अथणी, कागवाड, बैलहोंगल, कित्तूर, बेळगाव, चिकोडी, गोकाक, मुडलगी, हुक्केरी, खानापूर, रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती, यरगट्टी तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी सध्या चिकोडी आणि गोकाक तालुक्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. शिवाय रायबाग, रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्यात देखील दुष्काळी परिस्थिती आहे. या ठिकाणी देखील चारा छावण्या सुरू केल्या जाणार आहेत. येत्या काही दिवसांत चारा टंचाई गंभीर स्वरुप धारण करणार आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंगोपन खात्यामार्फत चारा छावण्यांसाठी तयारी केली जात आहे. जनावरांचे चाराविना हाल होणार आहेत, याची दखल खात्यामार्फत घेतली जाणार आहे. अशी माहितीही देण्यात आली आहे.

दिवसाला सहा किलो सुका चाऱ्याचा पुरवठा

बँक सुरू करून सोय केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दोन रुपये किलो प्रमाणे दिवसाला सहा किलो सुका चारा पुरविला जात आहे. याला शेतकऱ्यांचाही प्रतिसाद मिळू लागला आहे.

- डॉ. राजीव कुलेर-पशुसंगोपन खाते

Advertisement
Tags :

.