जांबोटी-बेळगाव शटल बससेवा सुरू करा
जांबोटी भागातील नागरिकांची मागणी
वार्ताहर/कणकुंबी
खानापूर आगाराच्या नियोजनाअभावी बेळगाव-जांबोटी व कणकुंबी अशी बस वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी बेळगाव-जांबोटी अशी शटल बससेवा सुरू करावी, अशी मागणी जांबोटी भागातील प्रवासी वर्गाने केली आहे. सद्यस्थितीत बेळगाव ते गोवा अशी आंतरराज्य बससेवा असली तरी स्थानिक नागरिकांना बेळगाव ते जांबोटी असा प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गोवा-बेळगाव बसमुळे स्थानिक बससेवेवर याचा परिणाम झाला आहे. विशेषत: कणकुंबी, चिखले या दोन्ही मुक्कामाच्या बसगाड्या सकाळी गेल्यानंतर म्हणजे सकाळी दहा त सायंकाळी 6 पर्यंत स्थानिक प्रवाशांना बससेवा उपलब्ध नाही.
तसेच जांबोटी भागातून बेळगावला कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बससाठी तासन्तास ताटकळत बसावे लागते. त्यासाठी जांबोटी ते बेळगाव अशी शटल बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी जांबोटीतील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद डांगे यांनी केली. बेळगाव-गोवा अशी आंतरराज्य बससेवा स्थानिक प्रवाशांना निरुपयोगी आहे. या भागातील कुसमळी, कालमणी, चिखले, बेटणे, उचवडे, सोनारवाडी आदी गावांमध्ये गोव्याला जाणाऱ्या बसेस थांबवल्या जात नाहीत. जांबोटी ते बेळगाव अशी बससेवा सुरू करावी, जेणेकरून स्थानिक प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, अशी मागणी जांबोटी भागातील नागरिकांकडून वारंवार केली जात आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी बेळगाव-जांबोटी अशी शटल बससेवा सुरू होती. त्यामुळे नागरिकांची सोय होत होती. परंतु खानापूर आगार सुरू झाल्यापासून बेळगाव-जांबोटी बससेवा बंद झाली. त्यामुळे जांबोटी भागातील प्रवाशांची त्रेधातिरपीट होत आहे.
...अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ
बेळगाव-गोवा या बसला केवळ ठराविक बस स्टॉप असल्याने मधल्या टप्प्यातील गावातील प्रवाशांना या बसमध्ये घेतले जात नाही. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना या आंतरराज्य बसचा काही उपयोग होत नाही. बेळगाव-जांबोटी अशी शटल बससेवा सुरू झाली तर त्याचा स्थानिक प्रवाशांबरोबरच कॉलेज विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून शटल बससेवा सुरू करावी, अन्यथा बससाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ जांबोटी भागातील नागरिकांवर येणार आहे.