वारकऱ्यांसाठी हुबळी-पंढरपूर ट्रेन सुरू करा
जोयडा तालुका वारकरी मेळाव्यात मागणी
वार्ताहर/रामनगर
जोयडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वारकरी सांप्रदाय आहे. अजून वारकरी सांप्रदाय वाढावा तसेच तालुक्यातील वारकरी सांप्रदायाला हुबळी-पंढरपूर थेट ट्रेन सुरू करण्यासाठी रामनगरनजीक असणाऱ्या कुंबेली नाका येथे रविवार दि. 26 रोजी जोयडा तालुका मर्यादित वारकरी मेळावा भरवण्यात आला होता. यानिमित्त सकाळी फोटो पूजन व त्यानंतर सकाळी दहा ते अकरा दरम्यान ‘जय जय राम कृष्ण हरी’ या बीज मंत्राचा नामजप करण्यात आला. त्यानंतर प्रवचन कार्यक्रम करण्यात आला. जोयडा तालुक्यातून आलेल्या समस्त वारकऱ्यांना महाप्रसादाचे आयोजन केले होते.
सायंकाळी तीन ते पाच दरम्यान गुरुवर्य गोपाळ आण्णा भाऊसाहेब वासकर महाराज पंढरपूर यांचे कीर्तन झाले. जोयडा तालुक्यातील वारकरी सांप्रदायातर्फे हुबळी-लोंढा-खानापूर-बेळगाव तसेच मिरजमार्गे पंढरपूरसाठी रेल्वे सुरू होती. ती कोरोना काळापासून बंद केलेली ट्रेन पुन्हा सुरू करण्यासाठी जोयडा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मारुती पाटील यांच्यामार्फत हल्याळ जोयडाचे आमदार आर. व्ही. देशपांडेंना निवेदन दिले होते. आमदार देशपांडे यांनी रेल्वेमंत्री व्ही. सोमण्णा यांना हुबळी पंढरपूर लवकरात ट्रेन सुरू करण्याचे निवेदन दिल्याने आता लवकरच हुबळी-पंढरपूर खास वारकऱ्यांसाठी ट्रेन सुरू होणार आहे. याचा जोयडा तालुक्यातील वारकऱ्यांबरोबरच खानापूर-बेळगाव तालुक्यातील वारकऱ्यांना लाभ होणार आहे.