बेळगावहून पुण्यासाठी विमानसेवा सुरु करा!
मंत्री प्रियांक खर्गे यांचा विमान कंपन्यांना सल्ला : सहा शहरांमधील विमानसेवा बळकट करण्यासंबंधी बैठक
बेंगळूर : बेळगावहून सध्या आठवड्यातून 44 विमानांचे उड्डाण होते. येथून पुण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याची मागणी आहे. मात्र, लँडींगच्या वेळेच्या समस्या आहे. मात्र, याचा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार करावा. येथून चेन्नई, कोची आदी ठिकाणी विमानसेवेसाठी उत्तम संधी आहे. येथून कलबुर्गीसाठी देखील विमानफेरी सुरु करता येऊ शकते, असा सल्ला आयटी-बीटी मंत्री प्रियांक खर्गे यांनी विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींना दिला. बेळगाव, कलबुर्गीसह राज्यातील द्वितीय श्रेणीच्या सहा शहरांमधील विमान प्रवासी सेवा आणखी बळकट करण्यासंबंधी उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास मंत्री एम. बी. पाटील यांनी मंगळवारी विविध विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. बेंगळूरच्या खनिज भवनमध्ये आयोजित बैठकीत माहिती-तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खर्गे देखील बैठकीला उपस्थित होते.
बेळगाव, कलबुर्गी, हुबळी, बिदर, म्हैसूर, बळ्ळारीतील विद्यानगर (जिंदाल टाऊनशिप) आणि उद्घाटनासाठी सज्ज असलेल्या विजापूर येथील विमानतळांवरून राज्यासह परराज्यातही विमानफेऱ्या वाढविण्याबाबत विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी विस्तृत चर्चा झाली. कलबुर्गी विमानतळ प्रवाशांसाठी लाभदायक असले तरी बेंगळूरहून येथे आठवड्यातून केवळ तीन उड्डाणे होतात. विमानफेऱ्या वाढवून प्रवाशांची सोय करावी. केवळ बेंगळूरलाच नव्हे तर इतर प्रमुख शहरांशीही संपर्काची व्यवस्था करावी, अशी सूचना मंत्री एम. बी. पाटील यांनी केली. त्यावर विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पायाभूत सुविधा खात्याच्या सचिव एन. मंजुळा, औद्योगिक पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या प्रमुख खुशबू गोयल, मंत्र्यांचे तांत्रिक सल्लागार अरविंद गलगली व इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.