बेळगाव-पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सुरू करा
निलजी येथील श्रीराम मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचे इराण्णा कडाडी यांना निवेदन
वार्ताहर/सांबरा
बेळगाव ते पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन निलजी येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांना दिले. बेळगाव शहर परिसरातून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. मात्र, बेळगाव ते पंढरपूर दरम्यान एकही पॅसेंजर रेल्वे नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. येथून दर शुक्रवारी जाणारी यशवंतपूर-पंढरपूर ही एक एक्स्प्रेस वगळता पंढरपूरला जाण्यासाठी अन्य कोणतीही रेल्वे नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. बेळगाव ते पंढरपूर व पंढरपूर ते बेळगाव पॅसेंजर रेल्वे सुरू केल्यास येथील नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.
त्यासाठी केंद्र सरकारने तातडीने बेळगाव पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी निवेदनाचा स्वीकार करून इराण्णा कडाडी म्हणाले की, सध्या सरकारने संपूर्ण भारतात वंदे भारतसारख्या रेल्वे सुरू करण्यावर भर दिला आहे. बेळगाव-पंढरपूर रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी आपण नियमित पाठपुरावा करत असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टचे अॅड. लक्ष्मण पाटील, गंगाराम मोदगेकर, अप्पाजी अक्षिमणी, कृष्णराव मोदगेकर, भरमा गोमानाचे, वसंत पाटील, मधू पाटील, संदीप निलजकर, चंद्रकांत पाटील, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.