हलगा गावासाठी स्वतंत्र बस सुरू करा
परिवहन मंडळाकडे ग्रामस्थांची मागणी
बेळगाव : हलगा येथील विद्यार्थी व नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची मागणी गावकऱ्यांनी परिवहन मंडळाकडे केली आहे. यासंबंधी परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदनही दिले असून बससेवा पुरविली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हलगा गावासाठी स्वतंत्र बससेवा नाही. बस्तवाड, के. के. कोप्प, हलगीमर्डीसह या परिसरातील इतर गावांना जाणाऱ्या बसमधून प्रवास करावा लागतो. गर्दीमुळे या बसमधून प्रवास करणेही कठीण जाते. त्याचा फटका शाळकरी मुलांना बसत आहे. सुरळीत बससेवा नसल्यामुळे मुलांच्या शैक्षणिक जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हलगा गावाला स्वतंत्र बस सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रा. पं. सदस्य गणपत मारिहाळकर, सागर कामाण्णाचे, सदानंद बिळगोजी, रोहित येळ्ळूरकर, प्रसाद धामणेकर, शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ निवेदन देताना उपस्थित होते. खासकरून सकाळी व सायंकाळच्या वेळी बसफेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे.