स्टारशिप’चे उड्डाण दुसऱ्यांदाही अयशस्वी
टेक ऑफ केल्यानंतर बूस्टरचा स्फोट, संपर्क तुटला
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकन उद्योगपती आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सने शनिवारी पुन्हा एकदा आपले मेगा रॉकेट स्टारशिप लॉन्च केले. मस्क यांचा हा दुसऱ्यावेळचा प्रयत्नदेखील अयशस्वी झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चाचणी उड्डाणानंतर काही मिनिटांतच बूस्टरशी संपर्क तुटला. तसेच त्यानंतर अंतराळयानाचा संपर्क तुटला. बूस्टरने स्टारशिपला अंतराळाच्या दिशेने पाठवले असले तरी दक्षिण टेक्सासवरील लिफ्टऑफनंतर आठ मिनिटांत संप्रेषण तुटले. यानंतर स्पेसएक्सने मिशन अयशस्वी झाल्याची माहिती दिली. यापूर्वी हे 17 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार होते, परंतु ग्रीड फिनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याचे लाँचिंग एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आले होते.
दक्षिण टेक्सासमध्ये एप्रिलमधील पहिले प्रक्षेपण देखील अयशस्वी झाले होते. प्रक्षेपणानंतर काही वेळाने स्फोट झाल्याने ते नष्ट झाले. मेक्सिकोच्या आखातात स्टारशिप क्रॅश झाले. मात्र, कोणीही जखमी झाले नाही. पहिले मिशन अयशस्वी झाल्यानंतर कंपनीने अनेक सुधारणा केल्या. असे असतानाही पुन्हा एकदा अपयश आले. दुसऱ्या उड्डाणावेळी आकाशात स्टारशिप रॉकेटचा आवाज ऐकू आला. हे रॉकेट मेक्सिकोच्या आखातावरूनही उडून गेले, पण ते नष्ट करावे लागले. या रॉकेटला त्याच्या बूस्टरपासून वेगळे करून अवकाशात पाठवणे हा स्पेसएक्सचा मुख्य उद्देश होता. स्टारशिपची ही दुसरी परिभ्रमण चाचणी होती.
स्पेस-एक्सचे स्टारशिप स्पेसक्राफ्ट आणि मोठे रॉकेट एकत्र करून त्यांना स्टारशिप असे नाव दिले आहे. हे स्टारशिप एकाच वेळी 100 लोकांना मंगळावर नेण्यास सक्षम असेल. ते एका तासापेक्षा कमी वेळेत माणसांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवण्यास सक्षम असेल. हे स्टारशिप जगातील सर्वात मोठे रॉकेट असल्याचे म्हटले जात आहे. त्याची उंची 394 फूट आणि व्यास 29.5 फूट आहे. हे रॉकेट दोन भागात विभागले गेले आहे. वरच्या भागाची उंची 164 फूट आहे. त्याच्या आत 1200 टन इंधन आहे. दुसऱ्या भागाची उंची 226 फूट आहे. हे पुन्हा वापरण्यायोग्य आहे. त्यात 3400 टन इंधन आहे. नासाच्या आर्टेमिस मून कार्यक्रमांतर्गत स्टारशिपचा वापर केला जाईल.