दशकानंतर रणजी ट्रॉफीत स्टार्सचा तडका
रोहित शर्मा, विराट कोहलीसह , यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, शुभमन गिल खेळणार
वृत्तसंस्था/ मुंबई
रणजी ट्रॉफी स्पर्धा आज गुरुवारपासून पुन्हा सुरू होत असून बडे खेळाडू यावेळी त्यात खेळताना दिसतील. हे एक दुर्मिळ चित्र असून रोहित शर्मा व रिषभ पंत, जडेजासारखे मोठे खेळाडू त्यांच्या संघाकडून खेळण्यास राजी झाले आहेत. प्रामुख्याने बीसीसीआयच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याच्या कठोर आदेशामुळे हे शक्य झाले आहे.
रोहित जवळजवळ एका दशकानंतर गतविजेत्या मुंबईतर्फे खेळणार असून रणजी चषक स्पर्धेचा उत्तरार्ध वेगवेगळ्या ठिकाणच्या सामन्यांनी सुरू होणार आहे. या हंगामात प्रथमच मर्यादित षटकांच्या दोन सर्वांत मोठ्या स्पर्धा सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक आणि विजय हजारे चषक यांनी रणजी चषक स्पर्धेला दोन भागांमध्ये विभागले. आहे यामध्ये प्रत्येक राज्य संघ पहिल्या टप्प्यात प्रत्येकी पाच सामने खेळलेला असून दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक संघाला आणखी दोन सामने खेळावे लागतील. यात केवळ सहभागी संघांचेच नव्हे, तर विविध राष्ट्रीय खेळाडूंचेही भवितव्य पणाला लागले आहे. घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध आणि परदेशातील मालिकेत ऑस्ट्रेलियाविऊद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ते आता स्थानिक क्रिकेटकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत.
30 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या गट फेरीच्या अंतिम टप्प्यासाठी दिल्ली संघात सामील होण्यापूर्वी सुपरस्टार विराट कोहलीला मानेच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी आणखी काही दिवस लागतील, तर रोहित अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईकडून खेळणार आहे. मुंबई संघ त्याला यशस्वी जयस्वालसोबत आघाडीवर पाठविण्याची शक्यता आहे. त्यांचा सामना जम्मू काश्मीर संघाशी होईल, जो सध्या एलिट गट ‘अ’मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.
शुभमन गिल पंजाबकडून खेळणार
राजकोटमध्ये दिल्लीचा सामना दोन वेळा विजेता राहिलेल्या सौराष्ट्रशी होईल. यात रिषभ पंतचा सामना भारतीय संघातील सहकारी रवींद्र जडेजा आणि चेतेश्वर पुजारा यांच्याशी होईल. गट ‘ड’मधील या दोन्ही संघांना ही लढत जिंकणे आवश्यक आहे. ‘क’ गटात पंजाबचा सामना विजय हजारे चषक जिंकल्याने आत्मविश्वास वाढलेल्या कर्नाटकशी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. यावेळी भारताचा नवीन एकदिवसीय उपकर्णधार शुभमन गिलवर सारे लक्ष केंद्रीत असेल. इंग्लंडविऊद्धच्या टी-20 सामन्यांसाठी राष्ट्रीय संघात निवडल्या गेलेल्या अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग यांच्या अनुपस्थितीची भरपाई गिलच्या सहभागाने काही प्रमाणात केली आहे. कर्नाटक संघाला देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या पुनरागमनामुळे बळकटी मिळेल.
दुसरीकडे, बंगालला कल्याणी येथील हरयाणाविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अभिमन्यू ईश्वरन तसेच मोहम्मद शमीची उणीव भासेल, तर जयपूरमध्ये होणाऱ्या गट ‘ब’च्या सामन्यात विदर्भ राजस्थानचा सामना करेल.
आजपासून सुरु होणारे रणजी सामने
- महाराष्ट्र वि बडोदा, नाशिक
- मुंबई वि जम्मू व काश्मीर, मुंबई
- राजस्थान वि विदर्भ, जयपूर
- कर्नाटक वि पंजाब, बेंगळूर
- केरळ वि मध्य प्रदेश, तिरुअनंतपूरम
- तमिळनाडू वि छत्तीसगड, सालेम
- सौराष्ट्र वि दिल्ली, राजकोट.