‘स्टारलिंक’ला इंटरनेट सेवेसाठी अंतिम मंजुरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
उद्योपती एलॉन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारतात व्यावसायिक ऑपरेशन्स सुरू करण्यासाठी अंतिम नियामक मान्यता मिळाली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारतीय अंतराळ प्राधिकरण इन स्पेस (इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर) ने ही मान्यता दिली असल्याची माहिती आहे. ही मान्यता स्टारलिंकच्या भारतात प्रवेशासाठी शेवटचा मोठा अडथळा होता. स्टारलिंक 2022 पासून भारतात परवाना मिळविण्याचा प्रयत्न करत होती. ही स्पेसएक्सची सॅटेलाइट इंटरनेट सेवा आहे. गेल्या महिन्यात, कंपनीला दूरसंचार विभाग (डिओटी) कडून आवश्यक परवानगी मिळाली होती, परंतु ती अद्याप अंतराळ विभागाकडून हिरवा सिग्नल येण्याची वाट पाहत होती, जी आता पूर्ण झाली आहे. स्टारलिंकला तिसरा ऑपरेटर म्हणून प्रवेश मिळण्याची शक्यता आहे. वनवेब (युटेलसॅट) आणि रिलायन्स जिओ नंतर स्टारलिंक आता भारतातील तिसरी उपग्रह इंटरनेट सेवा देणारी बनली आहे, जिला सरकारकडून सर्व आवश्यक नियामक मान्यता मिळाल्या आहेत.
सेवा सुरू करण्यापूर्वी...
रॉयटर्सच्या अहवालानुसार, सेवा सुरू करण्यापूर्वी स्टारलिंकला सरकारकडून स्पेक्ट्रम वाटप करावे लागेल. जमिनीवरील पायाभूत सुविधा उभाराव्या लागतील. यासोबतच सुरक्षे संदर्भातील नियमावली व त्यांचे पालन करावे लागेल.
जियो, स्टारलिंकमध्ये संघर्ष
स्पेक्ट्रम वाटपावरून जियो आणि स्टारलिंकमध्ये संघर्ष झाला आहे. ही नियामक मंजुरी प्रक्रिया इतकी सोपी नव्हती. स्टारलिंक आणि रिलायन्स जियो (मुकेश अंबानी यांची कंपनी) यांच्यात सॅटेलाइट इंटरनेटसाठी स्पेक्ट्रम कसे वाटप करायचे यावरून अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत.