स्टारलिंक-अॅमेझॉनची भारतात नवीन भागीदारी
लवकरच उपग्रह ब्रॉडब्रँड सेवा सुरु करण्यासाठी व्हीएसएटी कंपन्यांसोबत करार
नवी दिल्ली :
भारतात पहिल्यांदाच, स्टारलिंक आणि अॅमेझॉन कुइपर या दोन प्रमुख उपग्रह कंपन्यांनी व्हीएसएटी (व्हेरी स्मॉल अपर्चर टर्मिनल) कंपन्यांशी व्यावसायिक करार केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ही भागीदारी भारतातील एंटरप्राइझ (बी 2बी ) आणि सरकारी (बी 2जी) क्षेत्रात उपग्रह ब्रॉडबँड सेवा सुरू करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. भारतात उपग्रह स्पेक्ट्रमचे अधिकृत वाटप अद्याप प्रलंबित असताना हे करार झाले.
या कंपन्यांची योजना काय आहे?
स्टारलिंक आणि अॅमेझॉन कुइपर दोघेही भारतात लो-अर्थ ऑर्बिट (एलईओ) उपग्रह ब्रॉडबँड सेवांद्वारे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी सज्ज होत आहेत. या कंपन्या केवळ व्यवसाय आणि सरकारी क्षेत्राला लक्ष्य करत नाहीत तर किरकोळ ग्राहक बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना देखील आखत आहेत. तथापि, किरकोळ विक्रीसाठी किंमत मॉडेल अद्याप अंतिम झालेली नाही.
सूत्रांच्या मते, स्टारलिंक आणि अॅमेझॉन दोघेही भारतात भागीदारीवर काम करत आहेत. त्यांनी काही व्हीएसएटी कंपन्यांशी करार केले आहेत, विशेषत: बी 2 बी आणि बी2जी विभागांसाठी. त्यांचे उद्दिष्ट भारतात त्यांच्या उपग्रह क्षमतेचा पूर्णपणे वापर करणे आहे.
भारताचे व्हीएसएटी कोण आहेत?
भारतातील प्रमुख व्हीएसएटी कंपन्यांमध्ये ह्यूजेस कम्युनिकेशन्स, नेल्को आणि इनमारसॅट यांचा समावेश आहे. स्टारलिंक आणि अॅमेझॉन कुइपर दोन्ही व्यवसाय आणि किरकोळ विभागांमध्ये काम करण्याचा विचार करत आहेत.
स्टारलिंकने यापूर्वी रिलायन्स जिओ आणि एअरटेलसोबत ही भागीदारी जाहीर केली आहे. लवकरच स्टारलिंक त्यांच्या वेबसाइटद्वारे थेट ग्राहक कनेक्शन देखील सुरू करेल. अॅमेझॉन कुइपर देखील हे मॉडेल स्वीकारेल आणि भारताच्या विविधतेचा विचार करून कोणत्याही एका वितरकावर अवलंबून राहणार नाही.
व्हीएसएटी सेवांचा फायदा काय?
व्हीएसएटी सेवा सामान्यत: बँक शाखा, एटीएम, रिमोट गॅस स्टेशन, गोदामे, रिटेल चेन, सेल्युलर
बॅकहॉल, समुद्र आणि इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी आणि संरक्षण पायाभूत सुविधांसाठी वापरल्या जातात. एलईओ उपग्रहांद्वारे प्रदान केलेल्या हाय-स्पीड ब्रॉडबँडचा या क्षेत्रांना मोठा फायदा होईल.