जगन्नाथ रथयात्रेवेळी पुरीमध्ये चेंगराचेंगरी
तिघांचा मृत्यू : 50 जखमी : जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना हटवले : दोन अधिकारी निलंबित
वृत्तसंस्था/ पुरी, भुवनेश्वर
ओडिशातील पुरी येथे जगन्नाथ रथयात्रेदरम्यान रविवारी पहाटे 4 वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. जगन्नाथ मंदिरापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या गुंडीचा मंदिरासमोर ही दुर्घटना घडली. भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाचे दर्शन घेण्यासाठी येथे मोठी गर्दी जमली असताना चेंगराचेंगरी झाली.
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. यासोबतच, त्यांनी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली सविस्तर प्रशासकीय चौकशीचे आदेशही दिले आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी अरविंद अग्रवाल यांच्यावर रथयात्रेच्या संपूर्ण देखरेखीची जबाबदारी सोपवली आहे.
पुरीच्या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ त्यांच्या मावशीच्या घराच्या गुंडीचा मंदिरासमोर 9 दिवसांसाठी उभे असतात. बलभद्र आणि सुभद्रा यांचे रथ आधीच येथे पोहोचले होते. जगन्नाथ रथ उशिरा आल्यामुळे लोक तो पाहण्यासाठी स्पर्धा करू लागले. या दरम्यान चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये अनेक लोक पडल्याने चिरडले गेले. घटनेच्या वेळी तेथे पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात नव्हता असे सांगण्यात येत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे बसंती साहू (36), प्रेम कांती महंती (78) आणि प्रभात दास अशी आहेत. त्यांचे मृतदेह पुरी मेडिकल कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहेत. या घटनेपूर्वी शुक्रवार, 27 जून रोजी देवी सुभद्राच्या रथाभोवती गर्दी वाढल्याने अनेक भाविक जखमी झाले होते. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 70 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 9 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अधिकाऱ्यांवर कारवाई
पुरी रथयात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीनंतर ओडिशा सरकारने कडक पावले उचलली आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल राज्य सरकारने पुरीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बदली केली. चंचल राणा यांना नवीन जिल्हाधिकारी आणि पिनाक मिश्रा यांना नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच, या घटनेत कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल डीसीपी विष्णू पती आणि कमांडंट अजय पाधी यांना निलंबित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी
मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल तीव्र शब्दात दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘मी आणि माझे सरकार भगवान जगन्नाथाच्या सर्व भक्तांची वैयक्तिकरित्या माफी मागतो. हा निष्काळजीपणा अक्षम्य आहे’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओडिया भाषेत भाविकांची माफी मागितली. तसेच सुरक्षेतील त्रुटीची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.