भेटवस्तूसाठी चेंगराचेंगरी : 11 जण अत्यवस्थ
पुत्तूर येथे मुख्यमंत्री सहभागी झालेल्या कार्यक्रमात घटना
बेंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या सहभागी झालेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे 11 जण अत्यवस्थ झाल्याची घटन सोमवारी घडली. अत्यवस्थ झालेल्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मंगळूर जिल्ह्याच्या पुत्तूर तालुका तालुका क्रीडांगणावर ही घटना घडली. पुत्तूर येथे आमदार अशोक रै यांच्या मालकीच्या रै इस्टेट अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सोमवारी दुपारी ‘अशोक जनमन-25’ आणि दिवाळीनिमित्त वस्त्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ताट, कपडे वाटप करण्यात येत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. क्रीडांगणावर क्षमतेपेक्षा अधिक लोकांची गर्दी झाली होती. महिला आणि मुलेही मोठ्या संख्येने जमा झाले होते. भेटवस्तू स्वीकारण्यासाठी चढाओढ निर्माण झाल्याने चेंगराचेंगरी झाली. यावेळी 11 जण अत्यवस्थ झाले. त्यांना तातडीने पुत्तूर तालुका इस्पितळात दाखल करण्यात आले.
योगीता (वय 20), सुभा माडावू (वय 20), अमीता पाट्रकोडी (वय 56), लिलावती कडब (वय 50), वासंती बलनाड (वय 53), रत्नावती परीगेरी (वय 67), कुसूम (वय 62), अफिला पाट्रकोडी (वय 20), स्नेहप्रभा (वय 41), जशिला (वय 30) अशी अत्यवस्थ झालेल्यांची नावे आहेत. उपचारानंतर काहींना इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आला. महिला लहान मुलांना देखील घेऊन क्रीडांगणावर जमा झाल्या होत्या. गर्दी अधिक असल्याने पिण्याचे पाणी मिळविणे कठीण झाले होते. पावसामुळे क्रीडांगणावर चिखल निर्माण झाला होता. तेथे अपेक्षेप्रमाणे पूर्वतयारी नव्हती. रविवार 19 ऑक्टोबर रोजी पोलीस खात्याने कार्यक्रमाच्या आयोजकांना पत्र पाठवून योग्य व्यवस्था करण्याची सूचना दिली होती. कार्यक्रमस्थळी कमी खुर्च्यांची व्यवस्था केल्याने रविवारी सकाळी पोलिसांनी आयोजकांना फटकारले होते. त्यानंतर आणखी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तरी देखील क्रीडांगणावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने दुर्घटना घडली.