पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी
मेरठमधील घटना : गर्दीनंतर गेट बंद केल्याने जमाव नियंत्रणाबाहेर
वृत्तसंस्था/ मेरठ
उत्तर प्रदेशातील मेरठ जिह्यातील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमादरम्यान अचानक गोंधळ निर्माण झाला. व्हीआयपी एंट्री गेटवरून लोक कार्यक्रमस्थळाकडे येत असताना गेटजवळ गर्दी वाढली. लोकांच्या गर्दीमुळे सुरक्षा रक्षकांनी गेट बंद केल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान झालेल्या ढकलाढकलीत एक महिला गेटवरच पडली. तिथे उभ्या असलेल्या लोकांनी महिलेला उचलून कार्यक्रमस्थळावर असलेल्या मेडिकल कॅम्पमध्ये नेले. महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले असले तरी चेंगराचेंगरीमुळे घबराटीची परिस्थिती निर्माण झाली होती. चेंगराचेंगरीबाबत विनाकारण अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रमुखांनी दिला आहे.
पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमासाठी शुक्रवारी एक लाखाहून अधिक लोक मेरठला पोहोचले होते. शनिवार हा कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे.
प्रसिद्ध कथाकार प्रदीप मिश्रा यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी अनेक व्हीव्हीआयपी मेरठला पोहोचले आहेत. मेरठच्या शताब्दीनगरमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.