अगसगे ग्राम पंचायतीत कर्मचाऱ्यांची दांडी
मंगळवारी दिवसभर कामासाठी आलेले ग्रामस्थ ताटकळत : ग्राम पंचायतीचा कारभार रामभरोसे, वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
वार्ताहर/अगसागे
अगसगे ग्राम पंचायत कार्यालयात पीडीओंसह इतर कर्मचारी गैरहजर असल्याचे मंगळवारी पहावयास मिळाले. कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे ग्रामस्थांना आपल्या कामासाठी ताटकळत राहावे लागले. त्यामुळे या ग्राम पंचायतीचा कारभार रामभरोसे चालल्याचे निदर्शनास आले. याकडे तालुका व जिल्हा पंचायत अधिकारी लक्ष देणार का? याबाबत तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. पीडीओ एन. ए. मुजावर वारंवार कार्यालयात गैरहजर असतात व ग्रामस्थांची कामे वेळेत करून देत नाहीत. तसेच ग्राम पंचायतीचा विकासही होत नाही, असा आरोप करीत गेल्या सहा महिन्यांपूर्वी ग्राम पंचायतच्या काही सदस्यांनी त्यांची येथून त्वरित बदली करावी यासाठी जिल्हा पंचायतीला निवेदनदेखील देण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर बदलीची कारवाई झालीच नाही. सदर पीडीओ पुन्हा येरे माझ्या मागल्या म्हणून वेळकढूपणा करीत आहेत. ग्रामस्थ आपल्या कामासाठी पंचायतीत गेले असता तेथील कर्मचारी पीडीओ आज येत नाहीत, उद्या येत नाहीत अशी उत्तरे देतात. तसेच काहीवेळा दुपारी येतात अशी उत्तरे देण्यात येतात. त्यामुळे ग्रामस्थांना आपल्या कामासाठी ग्राम पंचायतीला हेलपाटे मारावे लागत आहेत.
मंगळवार दि. 28 रोजी नागरिक आपल्या कामानिमित्त ग्राम पंचायतीकडे गेले असता तेथे ग्राम विकास अधिकाऱ्यासह एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे दिसून आले. याबाबत सिद्राय गडकरी यांनी ग्राम विकास अधिकाऱ्यांना फोन लावला असता त्यांनी फोन उचलला नाही. तसेच त्याबाबत तालुका पंचायत अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. चलवेनट्टी, म्हाळेनट्टी व अगसगे ही तीन गावे मिळून ग्रुप ग्राम पंचायत आहे. चलवेनट्टी व म्हाळेनट्टी येथील ग्रामस्थ आपल्या कामासाठी सकाळी दहा वाजता ग्राम पंचायत कार्यालयामध्ये येतात. मात्र त्या ठिकाणी अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी एन. ए. मुजावर यांना वेळेवर का येत नाही असे विचारले असता तालुका व जिल्हा पंचायतीमध्ये कामे असतात अशी उत्तरे देतात. तालुका व जिल्हा पंचायतीमध्ये विचारले असता त्या ठिकाणीही ते उपस्थित नसतात. याबाबत अधिकाऱ्यांसमोरच शहानिशा झाली आहे. त्यामुळे वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी का कारवाई करीत नाहीत, यामागचे गौडबंगाल काय, अशी चर्चा ग्रामस्थांतून होत आहे. तसेच त्यांची बदली करणारे काही ग्राम पंचायत सदस्य तरी का गप्प आहेत, असा प्रश्नदेखील ग्रामस्थांतून केला जात आहे.
ता. पं. अधिकाऱ्यांना पाठविला व्हिडिओ
सदर पीडीओ यांना फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असला तरी ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे मंगळवारी ग्राम पंचायत कार्यालयामध्ये कोणीच नसल्याचा व्हिडिओ करून तालुका पंचायत अधिकाऱ्यांना पाठविला आहे. तरी वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार आहेत, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.