सेंट झेवियर्सकडे दीपा रेडेकर चषक
वसुंधरा उत्कृष्ट खेळाडू तर सरशा सौदागर उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स अकादमी आयोजित दीपा रेडेकर स्मृती चषक सेवन-ए-साईड आंतरशालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने सेंट जोसेफचा 2-0 असा पराभव करुन दीपा रेडेकर चषक पटकाविला. तर संत मीरा संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून वसुंधरा तर उत्कृष्ट गोलरक्षक सरशा सौदागर यांना चषक देवून गौरविण्यात आले. सक्षम स्पोर्ट्स एरेना लोटस काऊंटी, टिळकवाडी येथील टर्फ मैदानावर या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात सेंट जोसेफ अ संघाने संत मीरा अ संघाचा 2-0 असा पराभव केला.
या सामन्यात 17 व्या मिनिटाला सेंट जोसेफच्या रियाच्या पासवर स्तुती एस.ने गोल करुन 1-0 ची महत्त्वाची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. या सत्रात संत मीराच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी दवडल्या. दुसऱ्या सत्रात 41 व्या मिनिटाला स्तुतीच्या पासवर रिया डब्ल्यूने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी सेंट जोसेफला मिळवून दिली. या सामन्यात संत मीरा संघाला मात्र गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्स अ ने सेंट जोसेफ ब संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला.पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण दोन्ही संघांना अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला.
दुसऱ्या सत्रात 39 व्या मिनिटाला झेवियर्सच्या वसुंधराने सुरेख गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. शेवटी हा सामना झेवियर्सने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात संत मीरा अ ने सेंट जोसेफ ब चा 1-0 असा निसटता पराभव केला. संत मीरातर्फे चित्राने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स अ ने सेंट जोसेफ ब चा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 13 व्या मिनिटाला झेवियर्सच्या श्रीवेणीच्या पासवर वसुंधराने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात 33 व्या मिनिटाला सहीदाच्या पासवर वसुंधराने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात सेंट जोसेफ संघाला गोल करण्यात अपयश आले. बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भातकांडे स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, जोतिबा रेडेकर, विजय रेडेकर, प्रगती रेडेकर, अमित रेडेकर, संकल्प मोहीते, रश्मी मोहीते, वर्षा पाटील, वरुण पाटील, आदिती रेडेकर, सुरज मजुकर, निखिल कांबळे, ओमकार कुंडेकर, शुभम यादव, विवेक सनदी व अमरदीप पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंट झेवियर्स, उपविजेता सेंट जोसेफ व तिसरा क्रमांक पटकाविलेल्या संत मीराला चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू वसुंधरा-सेंट झेवियर्स तर उत्कृष्ट गोलरक्षक सरशा सौदागर यांना गौरविण्यात आले.