सेंट झेवियर शवदर्शन सोहळा सुरू
राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेकांची उपस्थिती : 45 दिवसांत 50 लाख भाविक घेणार दर्शन
पणजी : देशविदेशातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत काल गुऊवार 21 नोव्हेंबरपासून जुने गोवेत सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शन सोहळ्यास प्रारंभ झाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, त्यांच्या सौभाग्यवती के. रिटा, वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांची यावेळी खास उपस्थिती होती. प्रत्येक दहा वर्षांनंतर या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा भाविकांसाठी अनेक सोयीसुविधांसह हा सोहळा आंतरराष्ट्रीय दर्जाचा करण्याचे सरकारकडून प्रयत्न झाले आहेत. त्यादृष्टीने गत दीड-दोन महिन्यांपासून जुने गोवे परिसरात नियोजन आणि विविध कामे सुरू होती. यंदा या तयारीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खास लक्ष घातले होते. तब्बल 45 दिवस चालणाऱ्या या सोहळ्यादरम्यान किमान 50 लाख भाविक जुने गोवेत भेट देऊन पवित्र अवशेषांचे दर्शन घेतील असा अंदाज आहे.
प्रार्थनासभेने झाला शुभारंभ
काल गुऊवारी सकाळी 9.30 वाजता खास प्रार्थनासभा झाल्यानंतर फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र अवशेष असलेली शवपेटी खास संगीत वाद्यासह बाँ जिझस बॅसिलिका चर्चमधून पलिकडील सेंट कॅथेड्रल चर्चमध्ये नेण्यात आली. यावेळी दिल्लीचे आर्चबिशप अनिल कुटो, आर्चबिशप फिलीप नेरी फेर्रांव, प्रदर्शन समितीचे निमंत्रक फादर हेन्री फाल्कांव यांच्यासह आर्चबिशपांची उपस्थिती होती.
परराज्यांतून येणाऱ्यांना ‘भाविकांचे गाव’
भाविकांच्या सोयीसाठी पिण्याचे पाणी, शौचालय, विश्रामगृह, पार्किंग जागेपासून चर्चपर्यंत येण्यासाठी विशेष बग्गी वाहने, आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. अन्य राज्यांमधून येणाऱ्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था म्हणून यंदा प्रथमच खास ‘भाविकांचे गाव’ उभारण्यात आले आहे. दि. 3 डिसेंबर रोजी होणाऱ्या फेस्तसाठी मुख्यमंत्री आणि अन्य मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहेत. दि. 27 डिसेंबर रोजी ‘लाईट आणि म्युझिक शो’ आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या सोहळ्याचे ते खास आकर्षण असेल, असे सांगण्यात आले. ’आम्ही सुवार्तेचे संदेशवाहक’ या संकल्पनेवर यंदाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अन्य ठळक वैशिष्ट्यांमध्ये कला प्रदर्शन आणि स्मरणार्थ पुस्तकाचे प्रकाशन यांचा समावेश आहे, अशी माहिती आर्चडायोसीसच्या प्रदर्शन समितीचे निमंत्रक हेन्री फाल्कांव यांनी दिली.
शवप्रदर्शनात घातपाताच्या शक्यतेने ,‘पीएफआय’च्या पाचजणांवर कारवाई
जुने गोवे येथे काल गुरुवारपासून सुरू झालेल्या शवप्रदर्शनात गालबोट लागेल, घातपात घडेल, शांतता बिघडेल, अशी घटना घडवून आणण्याची शक्यता असलेल्या आणि भारत सरकारने बंदी घातलेल्या ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय)च्या चार सदस्यांना दक्षिण गोवा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली. शांततेचा भंग करु पाहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या 126 कलमाखाली दंडाधिकारी प्रतिबंधात्मक कारवाई करु शकतो. याच नियमाचा आधार घेऊन ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या या चार सदस्यांची तपास यंत्रणेने चौकशी केली.
सासष्टीतील चौघांची चौकशी
रुमडामळ-दवर्ली येथील यासिन नालूर, लायमती-दवर्ली येथील महम्मद हावेरी, इंदोना-दवर्ली येथील इम्रान इल्हयास व कुंकळ्ळी येथील शेख रौफ यांची दक्षिण गोवा पोलिसानी चौकशी केली. भारत सरकारने बंदी घातलेल्या ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेचे वरील चौघेजण सदस्य असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयाने दिली. जुने गोवे येथे चालू असलेल्या शवप्रदर्शनाला गालबोट लागेल अशा प्रकारचे कृत्य करुन शांततेचा भंग करु पाहात असल्याची गुप्तचरांकडून सरकारला माहिती प्राप्त झाल्यानंतर वरील संशयितांवर ही कारवाई करण्यात आली. त्यांना दंडाधिकाऱ्यापुढे उभे करण्यात आले आणि सद्वर्तनाच्या हमीवर त्यांना घरी जाऊ देण्यात आले.
फोंड्यातही एकावर कारवाई
‘गोवा युथ फौंडेशन’ या संघटनेकडे संलग्न असलेल्या कुर्टी-फोंडा येथील अल्ताफ सनदी या युवकाचीही सखोल चौकशी करण्यात आली. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या 126 कलमाखाली ताब्यात घेतलेल्या या युवकाला दंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात आले आणि सद्वर्तनाच्या हमीवर घरी जाऊ देण्यात आले.