‘घर जैसा कुछ’ने इंडियन पॅनोरमाचा शुभारंभ
‘इफ्फी’ देतो गोव्याच्या आदरातिथ्याची साक्ष : भारतीय सिनेमांची विविधता स्पस्ट
पणजी : गोव्यात सुरू असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ याचबरोबर रसिकांसाठी पर्वणी ठरत आलेला आहे. चित्रपट सृष्टीतील सर्व घटकांचा गोव्यात होणारा सन्मान हा येथील आदरातिथ्याची साक्ष देतो, हा आतापर्यंतच्या गोव्यातील इफ्फी महोत्सवाच्या आयोजनातून दिसून आलेले आहे. भारतीय सिनेमांची विविधता इंडियन पॅनोरमामधून स्पष्ट होते. त्यामुळे इंडियन पॅनोरमांमधील देशाच्या सर्व क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळावे, यासाठी प्रयत्न केले आहेत, असे भारतीय चित्रपट निर्माता प्रिया कृष्णास्वामी यांनी सांगितले. पणजीतील आयनॉक्स 2 मधील क्रीनवर दाखविण्यात आलेल्या ‘घर जैसा कुछ’ हा लघुपट प्रदर्शित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील चित्रपटांच्या मालिकेला सुरुवात करण्यात आली.
काल गुऊवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन केल्यानंतर ‘आंचिम’ला सुरूवात झाली. यावेळी दिग्दर्शक शेखर कपूर, संजय जोशी, वंदना कोळी, रोहनन होबला, सुमय्या नालमुत्तू, प्रिया कृष्णस्वामी, समीर चाटे, रत्नोतमा गुप्ता अऊणकुमार बोस, नीलाय कौल, सुशांत मिश्रा, एस. एम. पाटील, हिमांशू शेखर, सुश्मिता मुखर्जी, मनोज जोशी, एम. डी. प्रभू, विनित खोनोजी, परीक्षक समीक्षक हिमांशु शेखर खटुआ आदी उपस्थित होते.इंडियन पॅनोरमा हा चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळणे ही गर्वाची गोष्ट असते. इंडियन पॅनोरमामधील देशातील सर्व क्षेत्रातील प्रतिनिधित्व मिळवणे हा आपला ध्यास होता, असे परीक्षक समीक्षक ‘घर जैसा कुछ’ हा लघुपट प्रदर्शित झाल्यानंतर हिमांशु शेखर यांनी सांगितले.
हदयस्पर्शी कथेची उबदारता
‘घर जैसा कुछ’ हा हर्ष संगानी दिग्दर्शित लडाखचा चित्रपट आहे. ‘घर आणि आपलेपणाचे सार’ सुंदरपणे दाखवितो. या हृदयस्पर्शी कथेत उबदारता आणि खोली अनुभवता येते. थिनलस त्याच्या वडिलांचा अस्थिकलश घेऊन त्याच्या दुर्गम गावात परततो. आगमन झाल्यावर तो त्या अस्थि गावात पुरण्याचा प्रयत्न करतो. तो त्याच्या भूतकाळाशी पुन्हा जोडला जात असताना, त्याचा वारसा आणि त्याचे भविष्य यांच्यातील एक जागा तयार होते. अशा कथानकावर आधारीत ‘घर जैसा कुछ’ हा रसिकांच्या मनात घर करून विचार करायला लावतो.