सेंट झेवियर्स फुटबॉल संघ विजेता
बेळगाव : माळमाऊती येथील लव्हडेल शाळेच्या टर्फ मैदानावर मानस फुटबॉल अकादमी आयोजित झेवियर्स चषक आंतर शालेय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने संत मीराचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. सकाळी झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेंट झेवियर्सने सेंट जोसेफचा 2-0 गोल फरकाने पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. झेवियर्सतर्फे मारिया मुजावर व वैष्णवी गावडे यांनी प्रत्येकी 1 गोल केले. अंतिम सामन्यात सेंट झेवियर्सने संत मीराचा 1-0 असा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. झेवियर्स संघाच्या जान्वी चव्हाणने एकमेव गोल केला.
प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सोहेल संगोळ्ळी, सुनील पाटील, मॅन्युअल डिव्रुझ, बसवराज अक्षीमनी, नौशाद जमादार, मानस नायक, यांच्या हस्ते विजेत्या सेंट झेवियर्स, उपविजेत्या संत मीरा संघांना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू जिया नाईक-सेंट जोसेफ, उत्कृष्ट स्ट्रायकर समिक्षा खन्नुरकर-संत मीरा, उत्कृष्ट डिफेन्डर जान्व्ही चव्हाण-सेंट झेवियर्स, उत्कृष्ट मिडफिल्ड स्वारा लगाडे-सेंट जोसेफ, उत्कृष्ट गोलरक्षक अनन्या रायबागकर-संत मीरा, अंतिम सामन्यातील सामनावीर आराध्या गुडगेनट्टी, शिस्तबद्ध संघ-कर्नाटक पब्लिक स्कूल खानापूर, उत्कृष्ट कोच-मॅन्युअल डिव्रुझ-सेंट जोसेफ, सी. आर. पाटील-संत मीरा.
स्पर्धेसाठी पंच म्हणून इमान बंदार, किरण के., अमन सय्यद, ताहीर बेपारी, आदर्श गणेशकर यांनी काम पाहिले. यावेळी वसुंधरा चव्हाण, किंजल जाधव, साक्षी चिटगी, श्रावणी सुतार, प्रांजल हजारे, श्र्रद्धा पाटील, सेजल, तेजल हंसी उपस्थित होते. स्पर्धेतील स्पर्धावीर मारिया मुजावर व हुसेन जमादार यांना सायकल बक्षीस देऊन गौरविण्यात आले.