सुवर्णसौध रस्त्यावरच शेतकऱ्यांचा रास्तारोको
सर्व्हिस रोडवर वाहनांच्या रांगा : राज्य सरकारमधील मंत्र्यांनी आंदोलकांची घेतली तातडीने दखल
बेळगाव : शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, कृषीकर्ज पूर्णपणे माफ करावे, यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना व हरित सेना (डॉ. वासुदेव मेटी ग्रुप) च्यावतीने मंगळवारी सुवर्णविधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सुवर्णसौधकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरच रास्तारोका सुरू केला. यामुळे सर्व्हिस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
अलारवाड ब्रीजपासून शेतकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली. आपल्या हक्कांसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शेतकऱ्यांनी सर्व्हिस रोडवर ठिय्या आंदोलन केले. काही केल्यास शेतकरी हटत नसल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. अखेर बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे उपायुक्त नारायण बरमणी घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला त्यांच्यासोबतही शेतकऱ्यांची शाब्दिक चकमक उडाली. अखेर शेतकऱ्यांनी रास्तारोको मागे घेत आंदोलनस्थळी आंदोलन करण्यास सहमती दर्शविली.
शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना पूर्वीप्रमाणेच मोफत व निरंतर वीजपुरवठा करावा, अलमट्टी जलाशयाची पातळी 519 मीटरवरून 524.23 मीटरपर्यंत वाढविण्यात यावी, शेती मालाला कायदेशीर हमीभाव द्यावा. शेतकरी सरकारी कार्यालयात जाण्याऐवजी सरकारी विभागांना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाठवावे, अशा मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनावेळी मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. खांद्यावर हिरवे टॉवेल घालून या शेतकऱ्यांनी रयत संघटनेची एकजूट दाखवून दिली. या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारमधील काही मंत्र्यांनी आंदोलकांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले.