एसटीचा टायरवरच पाच कोटींचा खर्च
कोल्हापूर / विनोद सावंत :
राज्य शासनाच्या योजनेमुळे एसटीच्या प्रवाशांची संख्या जरी वाढली असली तरी स्पेअर पार्टच्या दरात भरमसाठ झालेल्या वाढीमुळे खर्चातही वाढ झालेली आहे. यामध्ये बसचा मेंटनन्सचाही समावेश आहे. गेल्या 9 महिन्यांत एसटीच्या कोल्हापूर विभागाचे केवळ टायरवरच सुमारे 5 कोटी 80 लाख इतका खर्च झाला आहे.
राज्यात बीएसआरटीसीची पहिली बस 1 जून 1948 या दिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू आहे. सध्या 4370 कोटींचे उत्पन्न असणारे महामंडळ आहे. एक लाखाहून अधिक कर्मचारी आहेत. राज्यात 31 विभागातंर्गत एसटीचे कामकाज चालत असून 14 हजार बस आहेत. राज्यात रोज सुमारे 60 लाख प्रवाशी एसटीतून प्रवास करतात. एसटी सेवा राज्य शासनाकडून ना नफा ना तोटा तत्वावर सुरू केली आहे. सध्या राज्य शासनाने महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. 16 वर्षाने एसटी तोट्यातून फायद्यात येत आहे. नोव्हेंबरमध्ये विक्रमी 941 कोटींचे उत्पन्न झाले आहे. एसटीचे उत्पन्न जरी वाढलेले असले तरी त्या प्रमाणामध्ये एसटीचा खर्च देखील वाढलेला आहे. इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर व सुट्टया भागांच्या दरामध्ये झालेली वाढ याचा प्रतिकूल परिणाम एसटीचा खर्च वाढीवर झालेला आहे. त्यामुळे संचित तोटा 11 हजार कोटी पर्यंत पोहोचला आहे. सध्या एसटी सेवा देताना सर्वाधिक डिझेलवर खर्च होतो. त्या खालोखाल टायरीवर खर्च होतो.
एसटीच्या कोल्हापूर विभागामध्ये सध्या 717 बस मार्गस्थ असताता. जिल्ह्यात रोज 2 लाख 52 हजार किलोमीटर बस फिरते. यामध्ये मध्यवर्ती बसस्थानक येथील 125 बस रोज 40 हजार किलोमीटर प्रवास करतात. यामध्ये एक बस रोज किमान 400 किलोमीटर प्रवास करते. यामुळे टायरची झीज जास्त होते. परिणामी टायरवरील खर्चही जास्त होत आहे. विशेष कोल्हापूर विभागाकडे सध्या 9 वर्षापूर्वीच्या सर्व बस आहेत. त्यामुळे मेंटनन्सचे प्रमाण जास्त आहे. तसेच टायरी बदलाव्या लागतात. एका बसच्या 1 लाख किलोमीटर प्रवास झाल्यानंतर टायरी स्क्रॅप केल्या जातात. एप्रिल ते डिसेंबर 2024 या 9 महिन्यांत 5 कोटी 80 लाखांच्या टायरींची खरेदी केली आहे.
सीबीएसमधील महिना सुमारे 100 टायर रिमोल्ड
कोल्हापूर विभागातील केवळ मध्यवर्ती बसस्थानक येथील महिन्याला सुमारे 100 ते 150 टायर गोकुळ शिरगांवला रिमोल्डसाठी पाठवाव्या लागतात. रिमोल्डहून आल्यानंतर या टायरींचा वापर ज्या बसच्या मागील चाकातील टायरी संपूर्ण खराब झाल्या असतील त्या बससाठी केला जातो.
संकेत जोशी, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, सीबीएस वर्कशॉप
एक बस रोज 400 किलोमीटर प्रवास करते. बसच्या पुढील चाकातील दोन टायरींचे 50 हजार किलोमीटर अंतर झाल्यानंतर काढून त्या गोकुळ शिरगांव येथील एसटीच्या वर्कशॉपमध्ये टायर रिमोल्ड करण्यासाठी दिल्या जातात. या दोन चाकांसाठी नवीन टायरींचा वापर होतो. तर रिमोल्ड झालेल्या या दोन टायरी बसच्या मागील चाकासाठी वापर केल्या जाता. त्या टायरी 50 हजार किलोमीटरपर्यंत चालतात. त्यानंतर या टायरी स्क्रॅप कराव्या लागतात. एक टायर सुमारे 1 लाख किलोमीटरनंतर स्क्रॅप होते.
कोल्हापूर एसटी डेपोतील स्थिती
एसटी बसची संख्या - 717
रोजचे उत्पन्न - 80 लाख
रोजचे प्रवासी - 3 लाख
चालक - 1260
वाहक - 1361
चालक-वाहक - 287
डिझेलवर महिना खर्च - 19 लाख 50 हजार
टायरवर खर्च - 5 कोटी 80 लाख
एक बसचा रोजचा प्रवास - 400 किलोमीटर