प्राध्यापकांना बुद्धिबळचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील
शिवाजी विद्यापीठचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के
महाविद्यालयात चेस क्लब सुरु करा, बीपीएड, बीएडच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश करण्याची मागणी
कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठ व अंतर्गत महाविद्यालयात चेस क्लब सुरु करावेत, प्राध्यापकांना बुद्धिबळाचे प्रशिक्षण दिले जावे. बीए स्पोर्ट, बीपीएडी, एमपीएड, बीएड, एमएडच्या अभ्यासक्रमातही बुद्धिबळाचा समावेश करावा, या मागण्यांचा प्रस्ताव गुरुवारी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने देण्यात आला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिगंबर शिर्के यांना विद्यापीठातीलच राज्यपाल नियुक्त मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य सिद्धार्थ शिंदे व मेजर ध्यानचंद जीवन गौरव क्रीडा व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांच्याकडून डॉ. शिर्के यांना प्रस्ताव देण्यात आला. प्रस्तावातील मागण्या रास्त असून आगामी काळात सर्व बाजूंनी चर्चा करून प्रातनिधीक स्वरुपात 50 महाविद्यालयातील प्राध्यापकांना बुद्धिबळांचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन शिर्के यांनी दिले.
दरम्यान, बुद्धिबळावर आधारीत शिर्के यांच्या चर्चा करताना सिद्धार्थ शिंदे म्हणाले, बुद्धिबळ खेळणारे विद्यार्थी-विद्यार्थींनींची संख्या वाढवण्यासाठी शिवाजी विद्यापीठ व महाविद्यालयात चेस क्लब बनवावे लागतील. बीए स्पोर्ट, बीपीएडी, एमपीएड, बीएड, एमएडच्या अभ्यासक्रमातही कशा पद्धतीने बुद्धिबळाचा समावेश करता येईल याचाही विचार करावा. बुद्धिबळामुळे एकाग्रता, संयम, स्मरणशक्ती, दूरदृष्टी, आत्मविश्वास व संयोजन कौशल्य वाढीस लागते. विद्यार्थी-विद्यार्थींनींचा बौद्धिक व मानसिक विकास होतो. त्याचबरोबर विश्लेषण क्षमता व गणिती कौशल्य सुधारण्यास मदत होते. याचा फायदा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी होऊ शकतो, असेही शिंदे म्हणाले. ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे यांनी सांगितले की शैक्षणिक व विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या वतीने बुद्धिबळाबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव शिवाजी विद्यापीठाने मान्य करुन अंमलबजावणी केल्यास शिवाजी विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरेल.
यावर बोलताना कुलगुरु शिर्के म्हणाले, सर्व बाजूंनी चर्चा करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल. मागण्या मान्य झाल्यानंतर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने योग्य ते सहकार्य करावे लागेल. तसेच कृतीशील होण्यासाठी विद्यापीठाला मदतीचा हात द्यावा. जेणे करुन प्रस्तावाची विद्यापीठाला अंमलबजावणी करणे सोपे जाईल, असेही डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक अरुण मराठे, चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले, सचिव मनिष मारुलकर, उपाध्यक्ष धीरज वैद्य व पॅंडिडेट मास्टर अनिश गांधी उपस्थित होते.