सेंट जोसेफ ऑर्फंज, बीटा, एमएसडीएफ विजयी
बेळगाव : बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित अस्मिता खेलो इंडिया 15 वर्षांखालील मुलींच्या आंतर क्लब फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून सेंट जोसेफ ऑर्फंजने सेंट जोसेफ संघाचा, बिटा स्पोर्ट्स क्लबने संत मीराचा तर एमएसडीएफने बीडब्ल्युएफए संघाचा पराभव करुन प्रत्येकी 3 गुण मिळविले. लव्हडेल स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सेंट जोसेफ ऑर्फंजने सेंट जोसेफ एफसीचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. 28 व्या मिनिटाला अर्पणा के.च्या पासवर मेघा कोडाटीने गोल करुन 1-0ची आघाडी मिळवून दिली. 34 व्या मिनिटाला मेघा कोडाटीच्या पासवर अन्नपूर्णा के.ने दुसरा गोल करुन 2-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात सेंट जोसेफ एफसीला गोल करण्यात अपयश आले.
दुसऱ्या सामन्यात बिटा स्पोर्ट्स क्लबने संतमीराचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात 11 व्या मिनिटाला तनिष्का सप्रेच्या पासवर श्रुती चौगुलेने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 16 व्या मिनिटाला श्रुती चौगुलेच्या पासवर तनिष्का सप्रेने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 27 व्या मिनिटाला तनिष्काच्या पासवर श्रुती चौगुलेने तिसरा गोल करुन 3-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात संतमीराला गोल करण्यात अपयश आले. तिसऱ्या सामन्यात एमएसडीएफ संघाने बीडब्ल्युएचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात पाचव्या मिनिटाला वसुंधरा चव्हाणच्या पासवर श्रावणी सुतारने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 13 व्या मिनिटाला श्रावणीच्या पासवर वसुंधरा चव्हाणने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. 36 व्या मिनिटाला वसुंधराच्या पासवर श्रावणी सुतारने तिसरा गोल केला.