एसटी कर्मचाऱ्यांचा संप, सेवा विस्कळीत
चाकरमान्यांची होणार कोंडी: कर्मचारी संपावर ठाम 59 आगार पूर्णत: बंद
प्रतिनिधी, मुंबई :
कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कामगार संयुक्त कृती समितीने मंगळवार 3 सप्टेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांच्या अशा निर्णयामुळे राज्यभरातील एसटीची सेवा विस्कळीत झाली आहे. यामध्ये राज्यभरातील 251 आगारांपैकी 59 आगार पूर्णत: बंद होते. तर 77 आगारांमध्ये अंशत: वाहतूक सुरू राहिली असून 115 आगारांमध्ये पूर्णत: वाहतूक सुरू राहिल्याची माहिती आहे. गेणेश उत्सवासाठी गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या भाविकांना आता एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे विघ्न ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घ्यावे यासाठी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी एसटी संघटनांबरोबर चर्चेच्या फेऱ्या घेत राहिले. मात्र त्यांची बैठक निष्फळ ठरली आहे. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी संघटनांची बैठक आयोजित केली असून आज होणाऱ्या बैठकीतून तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
एसटी कर्मच़ाऱ्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मच़ाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्यामुळे राज्य सरकारही चिंतेत आहे. राज्य सरकारकडून एसटी कर्मच़ाऱ्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुऊ आहेत. यासाठी सरकारने एक बैठकही घेतली. या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे एसटी कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. एसटी कर्मचारी रात्री बारा वाजेपासून संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी संप कऊ नये, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
नियोजित फेऱ्यांमधील 11943 फेऱ्या रद्द
आंदोलनामुळे एसटीच्या नियोजित फेऱ्यांपैकी 11943 फ़ेऱ्या रद्द झाल्या आहेत. म्हणजेच दिवसभरात 50 टक्के वाहतूक बंद होती. या आंदोलनामुळे एसटीचा दिवसभर 14 ते 15 कोटी ऊपयांचा महसूल बुडाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून होणारी कोकणातील जादा वाहतूक सुरळीत होती. मात्र मंगळवारी मध्यरात्रीपासून कामगार संपावर गेल्यास जादा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य शासनाच्या कर्मच़ाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, कर्मच़ाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करावा, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम द्यावी, मागील करारातील त्रुटी दूर करावी, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, सर्व कर्मच़ाऱ्यांना वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीने आंदोलन पुकारले आहे.
राज्यभरात आंदोलनाचे लोण
संपाचा मुंबई विभागातील बस सेवेवर परिणाम झाला नाही. मुंबई विभागातील मुंबई सेंटरल आगार वगळता सर्व आगारांमध्ये बस सेवा सुरू आहे. परंतु ठाणे विभागातील बस सेवेवर फटका बसला आहे. ठाण्यातील कल्याण, विठ्ठलवाडी डेपो पूर्णपणे बंद आहेत. पूर्व महाराष्ट्रात विदर्भ वगळता राज्यातील इतर भागातील बस सेवांवर या संपाचा परिणाम झाला आहे. पुणे आणि नाशिक जिह्यात अनेक डेपो पूर्णपणे बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
गणपती स्पेशलाही फटका
राज्यभरात सुमारे 15,000 बस आणि 90,000 कर्मचारी आहेत. तर एसटी बसमधून 60 लाखांहून अधिक नागरिक प्रवास करतात. गणेशोत्सवानिमित्त 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून 5,000 अतिरिक्त ‘गणपती स्पेशल’ बस चालविण्यात येणार आहेत. मात्र या स्पेशल बससेवेलादेखील संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
विशेष म्हणजे सत्तेत असणारे आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा एसटी कर्मच़ाऱ्यांच्या संपाला पाठिंबा आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या एसटी कर्मच़ाऱ्यांचा संपालाही सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी एसटीचे राज सरकारमध्ये विलीनीकरणाला पाठिंबा दिला होता. मात्र आता त्यांनी विलिनीकरणाला विरोध दर्शविला आहे. दुसरीकडे मंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको. त्यामुळे संप मागे घ्या, अशी विनंती केली. पण एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर जाण्यास आग्रही राहिले आहेत.