Solapur News : सोलापुरात एसटी महामंडळाला पावसाचा जबर फटका ; लाखोंचे नुकसान
पावसामुळे सोलापुरात 1,643 एसटी फेऱ्या रद्द
सोलापूर : सप्टेंबर महिन्यात राज्यभर जोरदार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी अडथळा बनले. यामुळे सोलापूर जिल्ह्यात एसटीच्या ग्रामीण फेऱ्यांमध्ये थाटलेला अवरोध पाहायला मिळाला. २२ ते २६ सप्टेंबर दरम्यान १,६४३ एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने महामंडळाचे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले.
पावसामुळे एसटीला आर्थिक आणि वाहतूक दोन्ही क्षेत्रात मोठा फटका बसला. परंतु प्रशासनाच्या तत्परतेमुळे सेवा लवकरच पूर्ववतकरण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी दिली.
दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, अक्कलकोट आणि इतर परिसरात जोरदार पाऊस झाला. अनेक पूल बाहून गेले आणि काही ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली. परिणामी एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील १,६४३ फेऱ्या रद्द केल्या, ज्यामध्ये १,३४,५४२ किलोमीटरच्या फेऱ्या होत्या. या काळात एसटीला झालेल्या नुकसानामुळे प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागला.
काही फेऱ्या रद्द
सोलापूर सहायक विभागीय उमा वाहतूक अधिकारी गव्हाणे यांनी सांगितले, मागील महिन्यात पावसामुळे ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. परंतु आता पाऊस उघडल्यामुळे एसटीच्या सर्व फेऱ्या पूर्ववत केल्या आहेत. अनेक मार्गावरील पूल बाहून गेल्यामुळे गेल्या १५ दिवसांत बससेवा बंद होती; आता तात्पुरती व्यवस्था करून सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.