For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खातगुणमध्ये एसटीच्या गाड्या थांबणार

05:33 PM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
खातगुणमध्ये एसटीच्या गाड्या थांबणार
Advertisement

संवादिनीचे अध्यक्ष अगस्ती अरुण लावंड यांचा एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे पाठपुरावा

Advertisement

सातारा : स्वातंत्र्य सैनिकांचा वारसा असलेल्या सातारा जिल्ह्यातील मौजे खातगुण या गावात एस. टी. थांबा मिळावा यासाठी अनेक वर्षांची असलेली मागणी अखेर मंजूर होताना दिसते आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे संवादिनीचे अध्यक्ष अगस्ती अरुण लावंड यांनी पाठपुरावा केला आणि आज त्यांनी खातगुणला एसटी थांबा देण्याबाबत संबंधितांना उचित सूचना दिल्या आहेत. यामुळे खातगुणच्या विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध आणि भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

क वर्ग देवस्थान असलेल्या खातगुणमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या पंचात्तरीनंतरही साधी एस.टी. आलेली नाही यांची खंत गावकऱ्यांच्या मनात होती. गावची लोकसंख्या सुमारे 4000 च्या आसपास आहे. गाव मोठे असले तरी गावात माध्यमिक शाळा, कॉलेजची व्यवस्था नाही. गावात दवाखाने नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व आजारी रुग्ण / वृद्ध यांना तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे खटाव, पुसेगाव, कोरेगाव, फलटण वा साताऱ्याला जावे लागते. पण तिथे जाण्यासाठी गावाच्या बाहेर 2 ते 2.30 किमी मुख्य रस्त्यावर येऊन एस. टी. पकडावी लागते.

Advertisement

याचा फटका विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणावर पडत आहे. शाळा, कॉलेजच्या हजेरीवर याचा परिणाम होत आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. रुग्ण व वृद्ध यांना खाजगी गाडी करून जावे लागते.खातगुण गावात प्रसिद्ध राजेबागसार पीरसाहेबांचा दर्गा आहे. तिथे आजूबाजूच्या परिसरातून शेकडो भाविक येत असतात. पण ज्यांच्याकडे खाजगी गाड्या आहेत, तेच येऊ शकतात. गरीब भाविकांची प्रचंड गैरसोय होते. गाव तिथे एस. टी. हे आपलं ब्रीद आहे. पण खातगुण गावाने एस. टी. पाहिलीच नाही. पूर्वी रस्ते चांगले नाहीत हे कारण होतं, पण आता रस्ते ठीक आहेत. मुख्य रस्तावरून गावात एस. टी. यायला जेमतेम 2 मिनिट लागतात. अशी परिस्थिती अगस्ती लावंड यांनी एसटी व्यवस्थापकीय संचालक यांना सांगितली.

वडुज, कोरेगाव, फलटण, सातारा डेपोच्या एस.टी. ज्या मौजे खातगुण गावबाहेरून जातात या जवळच्या पल्ल्याच्या सर्व गाड्या गावात थांबा घेऊन वळसा घालून गेल्यास तसेच मुक्कामी एसटी मिळाल्यास खातगुणचे सर्व गांवकरी, भाविक, विद्यार्थी, वृध्द, रुग्ण, आपले उपकृत होऊ, अशी विनंतीही त्यांना केली. अगस्ती लावंड यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत एसटीच्या व्यवस्थापकीय संचालक यांनी याबाबत तातडीने संबंधितांना उचित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. आता लवकरच खातगुणमध्ये एसटी येईल अशी अपेक्षा आहे.

-अधिक माहितीसाठी संपर्क-अगस्ती अरुण लावंड +91 99877 03325

Advertisement
Tags :

.