पुण्यातून ओरोसला परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटीला नांदगाव येथे अपघात
सुदैवाने कोणीही जखमी नाही : काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती
कणकवली/ प्रतिनिधी
पुणे येथून ओरोस येथे परतणाऱ्या शैक्षणिक सहलीच्या एसटीचा नांदगाव ओटव फाटा पूल येथे अपघात झाला. बुधवारी भल्या पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास एसटी बस महामार्गावरील दुभाजकाच्या कठड्याला आदळली. सुदैवानेच या अपघातात दोन - चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
ओरोस येथील एका प्रशालेचे विद्यार्थी शैक्षणिक सहल आटपून परतत होते. शैक्षणिक सहलीच्या एकूण तीन बसेस होत्या. यातील एक बस नांदगाव ओटव फाटा येथील पुलावरील संरक्षक कठड्याला आदळली.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी तेथे धाव घेत मदतकार्य केले.पोलीस पाटील वृषाली मोरजकर,भुपेश मोरजकर, केदार खोत, प्रभाकर म्हसकर दिक्षा मोरजकर आदींनी मदतकार्य केले.
पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांनी पोलिसांना कळविले. अपघातातील किरकोळ जखमींना तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच हवालदार चंद्रकांत झोरे, श्री माने , महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव आदींनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.