शाळांच्या सहलीसाठी एसटीलाच ‘डिमांड’
कोल्हापूर :
सध्या शाळांच्या सहली सुरू आहेत. बहुतांशी शाळांची डिमांड एसटी बसमधूनच सहल करण्याचा आहे. 400 एसटी बस बुकिंग केल्या आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर राज्य मार्ग परिवहन महामंडळ शालेय सहलीसाठी 50 टक्के सवलत देते. या सहलीतून एसटीला 3 कोटी 46 लाख 87 हजार 420 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
एसटीची सेवा सुरक्षित असल्याने जिह्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांकडून शालेय सहलींसाठी एसटीची मागणी केली जाते. राज्य परिवहन महामंडळ शैक्षणिक सहलीसाठी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना प्रासंगिक कराराच्या दरात 50 टक्के सवलत देते. एसटीचे चालक हे प्रशिक्षित असतात. सर्व गाड्यांची वेळच्या वेळी देखभाल-दुरुस्ती केली जाते. त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी शाळांकडून एसटीची मागणी आहे.
शैक्षणिक संस्थांना 50 टक्के सवलत देऊन प्रति किलोमीटर 27.50 रुपये दर आकारला जातो. कोल्हापूर आगारातून शालेय सहलीसाठी साध्या बसेस पुरवल्या जातात. डिसेंबरपर्यंत जिह्यातील 400 हून अधिक शाळांनी प्रासंगिक कराराच्या एसटीची नोंदणी केली आहे. 2023-2024 मध्ये 1833 शालेय प्रासंगिक करार झाले होते. डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीमध्ये जास्त सहली जातात. एसटीचा अपघात झाल्यास प्रवाशांना दहा लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाते.
एसटीचे शाळांना पत्र
शालेय सहलीसाठी एसटीचा वापर करण्यासाठी विभाग नियंत्रकांतर्फे शिक्षण उपसंचालक व शिक्षण अधिकारी यांना आवाहन केले जाते. संबंधितांना सवलतीची माहितीसह पत्रव्यवहार केला जातो. त्यानुसार शाळांकडून एसटीची मागणी केली जात आहे.
यामुळेच एसटीकडे कल
एसटीची विश्वासार्हता कायम आहे. त्यामुळेच प्रवासाचा कमी दर, सुरक्षित प्रवास, अपघाती विमाही दिला जात असल्याने जिह्यातील शाळांचा एसटीकडे कल आहे.
सीबीएस आघाडीवर
मध्यवर्ती बसस्थानक (सीबीएस) मधून सर्वाधिक 100 हून बसची शालेय सहलीच्या एसटीची नोंदणी झाली आहे. त्यातून सुमारे दीड कोटीहून अधिक उत्पन्न या विभागाला मिळाले आहे.