दहावी परीक्षेला आजपासून प्रारंभ
बेळगाव जिल्ह्यात 97, चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 130 केंद्रे
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या एसएसएलसी परीक्षेला शुक्रवार दि. 21 मार्चपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील 97 व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 130 अशा एकूण 257 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. दोन्ही जिल्ह्यात मिळून एकूण 82 हजार 334 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेच्या दरम्यान कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत व प्रत्येक केंद्रावरील परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. परीक्षा केंद्रातील वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर अंतरापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे कोणत्याही व्यक्तींना, संस्थांना, प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना किंवा राजकीय पक्षांच्या व्यक्तींना परीक्षा केंद्रामध्ये जाण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स व सायबर सेंटर बंद ठेवण्याचा आदेशही देण्यात आला आहे. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रात मोबाईल फोन व कॅल्क्युलेटर नेता येणार नाही. प्रश्नपत्रिका फुटणार नाही याची दक्षता घेण्याची संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केली आहे. 600 पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी, तसेच ज्या परीक्षा केंद्रांना कंपाऊंड नाही तेथेसुद्धा हायसेक्युरिटी देण्यात येणार आहे. परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षण खाते व इतर खात्यांच्या अधिकाऱ्यांची जिल्हा पातळीवर चार भरारी पथके व प्रत्येक शैक्षणिक विभागासाठी तीन अशी एकूण 21 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने जि. पं. चे सीईओ राहुल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा : जि. पं. सीईओ शिंदे यांचे दहावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन
2024-25 मधील दहावी परीक्षेला शुक्रवार दि. 21 पासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना काही टिप्स दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केलेला असेलच. परीक्षेची तयारीही झाली असेल. मनात कोणतेही भयगंड, तणावात न राहता मनमोकळेपणाने परीक्षा केंद्रात प्रवेश करावा. शांत चित्ताने पहिल्यांदा प्रश्नपत्रिका वाचून घ्यावी. उत्तरपत्रिका लिहीत असताना सकारात्मक भावना ठेवावी. सगळी उत्तरे आपणाला देता येतीलच, अशा आत्मविश्वासाने उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करावी. पहिल्यांदा सोपे असणारे प्रश्न सोडवावेत. त्यानंतर सुलभ वाटणारे पुढील प्रश्न सोडवावेत. उत्तर लिहीत असताना द्विधा मन:स्थिती ठेवू नये. एकच निश्चय ठेवून उत्तरपत्रिका सोडवणे योग्य ठरेल.
एखाद्या प्रश्नाचे उत्तर न आल्यास त्याबद्दल मनात शंका किंवा निराशा न बाळगता चिंतन करावे. उत्तर सूचल्यानंतर लिहिण्याचा प्रयत्न करावा. परीक्षा सुरळीत होण्याच्यादृष्टीने सर्वतोपरीने तयारी केली आहे. विद्यार्थ्यांनी याची नोंद घेऊन परीक्षेला हजर रहावे. जिल्ह्याचा निकाल उत्तमरीतीने लागावा, यासाठी शिक्षक, अधिकारी व पालक प्रयत्नशील आहेत. परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून तालुक्यात प्रथम स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा पंचायतीतर्फे प्रोत्साहन धन देण्यात येईल. त्याचबरोबर शैक्षणिक सहलीची संधी देण्यात येईल. उज्ज्वल भविष्यासाठी दहावीची परीक्षा महत्त्वाची असून प्रश्नपत्रिका निर्भयपणे सोडवा. परीक्षेत अपेक्षेप्रमाणे यश मिळवा, असे जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी म्हटले आहे.
राज्यात दहावी परीक्षेला 8.96 लाख विद्यार्थी
हावी परीक्षेला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. राज्यभरात 2,818 केंद्रांवर 8.96 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. 21 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळातर्फे दहावी परीक्षा-1 घेण्यात येत आहे. राज्यातील 15,881 माध्यमिक शाळांमधील 4.61 लाख मुले आणि 4.34 लाख मुली यंदा दहावी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रांभोवतीचा 200 मीटरपर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. दरम्यान, राज्य परिवहन महामंडळाने परगावातील परीक्षा केंद्रांवर हजर होणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेशपत्र दाखवून मोफत प्रवास करण्याची सोय केली आहे.