चेन्नई संघाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी श्रीराम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या बलाढ्या चेन्नई सुपर किंग्जच्या साहाय्यक गोलंदाज प्रशिक्षकपदी भारताचा माजी अष्टपैलू श्रीधरन् श्रीराम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज आणि अष्टपैलू श्रीरामला क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर प्रशिक्षकाचा अनुभव चांगलाच मिळाला आहे. 2016 ते 2022 या कालावधीत श्रीधरन श्रीराम ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे साहाय्यक गोलंदाज प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. आशिया चषक स्पर्धेसाठी श्रीराम बांगलादेशच्या टी-20 संघाचे सल्लागार म्हणून वावरत होते. चेन्नई सुपर किंग्जचे प्रमुख प्रशिक्षक न्यूझीलंडचे स्टिफन फ्लेमिंगसमवेत आता श्रीराम संघातील खेळाडूंना गोलंदाजीचे मार्गदर्शन करतील. 2025 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्सबरोबर 23 मार्चला खेळविला जाणार आहे. दरम्यान 22 मार्चला या स्पर्धेला प्रारंभ होणार असून कोलकात्ता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांच्यात सलामीची लढत ईडन गार्डन्स मैदानावर खेळविली जाणार आहे.