श्रीनगर गोशाळेची आरोग्य स्थायी समिती करणार पाहणी
‘तरुण भारत’ बातमीचा परिणाम : चाऱ्याच्या प्रश्नावरून बैठकीत करण्यात आली चर्चा
बेळगाव : ‘श्रीनगर गोशाळेतील जनावरांवर चाऱ्याअभावी उपासमारीची वेळ’ या मथळ्याखाली तरुण भारतने सचित्र बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे मंगळवारी महापालिकेच्या झालेल्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत गो-शाळेतील चाऱ्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. चाऱ्याअभावी जनावरांवर उपासमारीची वेळ येत असल्यास ही गंभीर बाब असून सद्यपरिस्थितीची आरोग्य स्थायी समिती स्वत: जाऊन पाहणी करेल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आरोग्य स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी राठोड होत्या. बाजूला सत्ताधारी गटनेते अॅड. हणमंत कोंगाली, सदस्य नितीन जाधव, मनपा प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, साहाय्यक पर्यावरण अभियंता हणमंत कलादगी, आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्यासह आरोग्य स्थायी समिती सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीला कौन्सिल सेक्रेटरी प्रियांका विनायक यांनी बैठकीपुढील विषयांचे वाचन केले. त्याचबरोबर मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवत मंजुरी देण्याची विनंती केली. यावेळी प्रामुख्याने सदस्य नितीन जाधव यांनी श्रीनगर येथील गोशाळेचा प्रश्न उपस्थित केला. शहरातील मोकाट जनावरे पकडण्यासाठी तातडीने नव्या ठेकेदाराची नियुक्ती करण्यात यावी. जुन्या ठेकेदाराचा ठेका संपल्याने तातडीने ठेकेदार नियुक्ती करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर श्रीनगर येथील गो-शाळेत चाऱ्याची टंचाई असल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ येत आहे. असा आरोप करत सदस्य नितीन जाधव यांनी गोशाळेतील सद्यस्थितीचे फोटोदेखील बैठकीत दाखविले. मात्र गोशाळेत पुरेशाप्रमाणात चाऱ्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे, याची पाहणी करण्यासाठी स्वत: आरोग्य स्थायी समिती भेट देईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करण्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. मात्र आरोग्य स्थायी समितीकडून मंजुरी घेण्यापूर्वीच अधिकाऱ्यांकडून एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. संबंधित ठेकेदाराकडून काही मोजक्याच ठिकाणच्या व पैसे मिळणाऱ्या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात आहे. असा आरोप करण्यासह गार्डनमधील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नवीन ठेकेदाराच्या नियुक्तीला मंजुरी न देता पुढील बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले. त्याचबरोबर अन्य विषयांवरही चर्चा करण्यात आली.