श्रीकांतचा चेनला धक्का, प्रणॉय पहिल्या फेरीतच बाहेर
वृत्तसंस्था/ पॅरिस
भारताच्या किदाम्बी श्रीकांतने बुधवारी येथे फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनला पराभवाचा धक्का देत पुऊष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला, परंतु एच. एस. प्रणॉयवर मात्र स्पर्धेतून लवकर बाहेर पडण्याची वेळ आली.
पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी वेळेशी स्पर्धा करणाऱ्या आणि जगात 24 व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांतने 14 व्या क्रमांकावरील चेनला 66 मिनिटांत 21-15, 20-22, 21-8 असे पराभूत केले. तैवानच्या खेळाडूशी त्याचा आतापर्यंत सात वेळा सामना झालेला आहे आणि त्यात श्रीकांतने मिळविलेला हा तिसरा विजय आहे. 2021 च्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलेल्या श्रीकांतची लढत पुढील फेरीत चीनच्या जागतिक क्रमवारीत 17 व्या क्रमांकावर असलेल्या लू गुआंग झूशी होईल. त्याने भारताच्या एच. एस. प्रणॉयची मोहीम 21-17, 21-17 अशी संपविली.
श्रीकांतची बाजू या लढतीत वरचढ राहिली. त्याने पहिल्या गेममध्ये 5-7 असे पिछाडीवर पडूनही पुढील 17 गुणांपैकी 14 गुण जिंकून गेम आपल्या नावावर केली. तथापि, चेनने दुसऱ्या गेममध्ये उसळी घेऊन सामना निर्णायक गेममध्ये नेण्यात यश मिळविले. तिसऱ्या गेममध्ये श्रीकांत 7-5 अशा परिस्थितीनंतर फॉर्मात आला आणि भारतीय खेळाडूने चेनला खूप मागे टाकत सरळ नऊ गुण मिळवले. शेजारच्या कोर्टात प्रणॉयही विजयाच्या वाटेवर आहे असे वाटले होते. पण शेवटी गुआंग झूचे पारडे भारी ठरले.