श्रीकांत, त्रिशा-गायत्री अंतिम फेरीत
वृत्तसंस्था / लखनौ
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीत माजी विजेत्या किदांबी श्रीकांतने अंतिम फेरीत प्रवेश मिळविला तर महिलांच्या दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात 32 वर्षीय श्रीकांतने आपल्याच देशाच्या मिथून मंजुनाथचा 21-15, 19-21, 21-13 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरी गाठली. किदांबी श्रीकांतने 2016 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. चालु वर्षीच्या बॅडमिंटन हंगामात किदांबी श्रीकांतने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आता अंतिम फेरीत किदांब श्रीकां तची लढत हाँगकाँगच्या जेसन गुणवानशी होणार आहे. किदांबी श्रीकांतने यापूर्वी दोनवेळा मिथून मंजुनाथचा पराभव केला होता.
महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी मलेशियाच्या हाँग झीन यी आणि कार्मेन किंग यांचा 21-11, 21-15 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मात्र या स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा यांचे आव्हान उपांत्य फेरीतच समाप्त झाले. तुर्कीच्या अॅरिनने उन्नती हुडाचा 21-15, 21-10 तर जपानच्या हिना अकेचीने तन्वी शर्माचा 21-17, 21-16 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.