श्रीकांत पराभूत, अनमोल, आकर्षी दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था / लोवा (अमेरिका)
2025 च्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतचे पुरुष एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. मात्र महिला एकेरीत भारताच्या अनमोल खर्ब आणि आकर्षी कश्यप तसेच तन्वी शर्मा यांनी विजयी सलामी दिली. पुरुष एकेरीच्या झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताचा माजी टॉपसिडेड चिदांबी श्रीकांतला इंग्लंडच्या हुआंगकडून पराभव पत्करावा लागला. या सुपर 300 दर्जाच्या स्पर्धेत इंग्लंडच्या हॅरी हुआंगने श्रीकांतचा 21-19, 12-21, 21-14 अशा गेम्समध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली.
त्याच प्रमाणे पुरूष एकेरीमध्ये भारताच्या प्रियांशु राजवत, शंकर सुब्रमणियन आणि रुत्विक संजीव यांचे आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. चीनच्या येन तिंगने सहाव्यामानांकित राजवतचा 21-14, 12-21, 21-7 असा पराभव केला. फ्रान्सच्या रॉयने संजीव सतीशकुमारचा चीनच्या लियाओने 21-13, 21-19 असा पराभव केला. भारताच्या आयुष शेट्टी आणि टी. मनिपल्ली यांनी पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे. आयुष शेट्टीने डेन्मार्कच्या जोहानसेनचा 21-17, 21-19 तर टी. मनिपल्लीने फ्रान्सच्या मर्कलचा 19-21, 21-18, 21-18 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.
महिला एकेरीमध्ये भारताच्या अनमोल खर्बने झेकच्या स्वेबीकोव्हाचा 16-21, 21-13, 21-19, आकर्षी कश्यपने चीनच्या लियांगचा 21-19, 21-10, असा केवळ 34 मिनिटांत पराभव करत पुढील फेरी गाठली. 66 व्या मानांकित तन्वी शर्माने व्हिएतनामच्या नेगुयेन लीनचा 21-19, 21-9 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. मिश्र दुहेरीत भारताच्या टॉपसिडेड जोडीला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली. ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांना चीन तैपेईच्या लीन आणि हंग यांनी 17-21, 21-16, 21-17 असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश मिळविला.