श्रीकांत, ऍक्सेलसेन यांची माघार, मालविका पराभूत
थायलंड ओपन बॅडमिंटन : मिश्र व महिला दुहेरीतही भारताचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था /बँकॉक
भारताच्या किदाम्बी श्रीकांतने येथे सुरू असलेल्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया फेरीतून माघार घेतल्याने त्याच्या प्रतिस्पर्ध्याला पुढे चाल देण्यात आली. महिला एकेरीत मालविका बनसोडचे आव्हान दुसऱया फेरीत समाप्त झाले तसेच पुरुष एकेरीत डेन्मार्कचा जागतिक अग्रमानांकित व्हिक्टर ऍक्सेलसेननेही दुखापतीमुळे दुसऱया फेरीतून माघार घेतली.
आठवे मानांकन मिळालेल्या श्रीकांतने पहिल्या फेरीत फ्रान्सच्या ब्राईस लेबर्डेझला हरवून दुसरी फेरी गाठली होती. पण दुसऱया फेरीत त्याने माघार घेतल्याने आयर्लंडच्या एन्हात एन्ग्युएनला पुढील फेरीत स्थान मिळाले. त्याच्या माघारीचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. महिला एकेरीत मालविका बनसोडचे आव्हान समाप्त झाले. तिला डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनकडून 21-16, 14-21, 14-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीची जोडी इशान भटनागर व तनिशा पॅस्टो यांचाही दुसऱया फेरीत पराभव झाला. त्यांना सहाव्या मानांकित मलेशियाच्या गोह सून हुआत व लाय शेव्हॉन जेमी यांनी 21-19, 22-20 असे हरविले. नंतर महिला दुहेरीत अश्विनी भट के. व शिखा गौतम यांनाही पराभव स्वीकारावा लागला. त्यांना जपानच्या पाचव्या मानांकित मायू मात्सुमोटो व वाकाना नागाहारा यांनी 21-19, 21-6 असे हरवित आगेकूच केली. पीव्ही सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लामचे कडवे आव्हान परतावून लावत दुसरी फेरी गाठली आहे.
गेल्या आठवडय़ात झालेल्या थॉमस-उबेर चषक स्पर्धेवेळी ऍक्सेलसेनला दुखापत झाली होती आणि पहिल्या फेरीतील सामन्यानंतर ही दुखापत आणखी चिघळल्याने जागतिक अग्रमानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसेनने दुसऱया फेरीतून माघार घेतली. यामुळे अव्वल दोन मानांकित खेळाडू या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
याआधी माजी वर्ल्ड चॅम्पियन केन्टो मोमोटाचा चीनच्या झाओ जुनपेंगकडून पहिल्याच फेरीत 21-2, 21-11 असा पराभव झाला. मागील आठवडय़ात झालेल्या स्पर्धेत काही खेळाडू कोर्टवर घसरून पडल्याने त्यांना दुखापती झाल्या आहेत. त्यात चीनच्या लु गुआंगझू याचाही समावेश आहे.