Sangli News : कवठेमहांकाळ येथे उद्या श्री विरभद्र यात्रा
श्री विरभद्र देवस्थानी उद्या महापूजा
कवठेमहांकाळ : सालाबादप्रमाणे कवठेमहांकाळ येथील लिंगायत, कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री. विरभद्र देवस्थानची यात्रा उद्या संपन्न होत आहे. यात्रेनिमित्त सकाळी ५.३० वाजता 'श्रीं'ची महापूजा व श्रींच्या मूर्तीस भाविकांकडून अभिषेक होणार आहे. दुपारी श्रींची आरती होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
लिंगायत कोष्टी समाजातील माजी सैनिक विलास बाबुराव जमगे यांच्या संकल्पनेतून व प्रतिष्ठित व्यापारी कै. भीमसेन बाळाप्पा जमगे यांच्या दातृत्वाने साकार झालेले श्री. विरभद्र देवस्थान कवठेमहांकाळच्या पंचक्रोशीतील भाविकांसाठी श्रद्धास्थान असून दर अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येतात.
श्री विरभद्र देवस्थाने विशेषतः इंडी, येडूर आणि गोडची ही कर्नाटक राज्यात तर कुंडल हे महाराष्ट्रात असून भाविकांच्या जाण्या-येण्याच्या दृष्टीने गैरसोयीची ठरत असल्याने सैन्यातून निवृत्त झाल्यावर जमगे यांनी धुळगाव रस्त्यावरील आपल्या शेतातील घराजवळ कलादगी (ता. बागलकोट, जि. विजापूर) येथून श्रींची मूर्ती आणून बेळंकी येथील सिद्धेश्वर देवालयाच्या महाराजांच्या हस्ते २००८ मध्ये तिची प्रतिष्ठापना केली.
तर कै. भीमसेन जमगे आणि समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत केल्याने कवठेमहांकाळ येथे लिंगायत, कोष्टी समाजाचे लेणे असणारे हे देवालय साकार झाले. दरवर्षी श्री गुरुदेव दत्त जयंती दरम्यान यात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यंदाही बुधवारी यात्रा व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.