वनडे मालिकेत लंकेची विजयी सलामी
विंडीजचा 5 गड्यांनी पराभव, असालेंका ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / कॅन्डी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान लंकेने विंडीजचा पहिल्या सामन्यात 5 गड्यांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी डकवर्थ लेविस नियमाचा अवलंब केला आणि त्यांना विजयासाठी 37 षटकात 232 धावांचे उद्दिष्ट दिले. लंकेने 31.5 षटकात 5 बाद 234 धावा जमवित विजय नेंदविला. या सामन्यात फलंदाजीत 77 धावा आणि गोलंदाजीत 1 गडी बाद करणाऱ्या चरीथ असालेंकाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंचांनी पावसामुळे हा सामना प्रत्येकी 38.3 षटकांचा खेळण्याचा निर्णय घेतला. विंडीजने 38.3 षटकात 4 बाद 185 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 31.5 षटकात 5 बाद 234 धावा जमवित हा सामना 31 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी जिंकला.
विंडीजच्या डावात रुदरफोर्डने दमदार फलंदाजी करताना 82 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 74 धावा झळकविल्या. रॉयस्टन चेसने 33 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 33 धावा केल्या. रुदरफोर्ड आणि चेस या जोडीने पाचव्या गड्यासाठी अभेद्य 85 धावांची भागिदारी केली. कार्टीने 58 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 37, किंगने 25 चेंडूत 2 चौकारांसह 14, कर्णधार हॉपने 5 धावा जमविल्या. अथांजेने 20 चेंडूत 10 धावा केल्या. लंकेतर्फे हसरंगाने 18 धावांत 2 तर व्हँडेरसे आणि असालेंका यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विंडीजने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 43 धावांत 2 गडी गमविले. तर विंडीजचे अर्धशतक 68 चेंडूत नोंदविले गेले. रुदरफोर्डने 64 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. विंडीजच्या डावात 4 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर जोसेफने अविष्का फर्नांडोला 5 धावांवर झेलबाद केले. पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 8 षटकात लंकेने 54 धावांत तीन गडी गमविले. यानंतर पंचांनी हा सामना 37 षटकांचा खेळविण्याचा निर्णय पावसाच्या अडथळ्यामुळे घेतला आणि लंकेला विजयासाठी 232 धावांचे नवे उद्दिष्ट दिले. लंकेचे अर्धशतक 40 चेंडूत नोंदविले गेले. लंकेने दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यान 165 धावांत 2 गडी गमविले. फर्नांडो आणि असालेंका यांनी चौथ्या गड्यासाठी अर्धशतकीय भागिदारी 45 चेंडूत नोंदविली. जोसेफने कुशल मेंडीसला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 13 धावा जमविल्या. मोतीच्या फिरकीवर समरविक्रमचा त्रिफळा उडाला. त्याने 3 चौकारांसह 18 धावा केल्या. मधूशेका आणि असालेंका यांनी चौथ्या गड्यासाठी 137 धावांची शतकी भागिदारी केली. मधूशेकाने 54 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 69 धावा झोडपल्या. तो डावातील 25 व्या षटकात मोतीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. कर्णधार असालेंकाने 71 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 77 धावा झळकविल्या. लियानगे आणि कमिंदु मेंडीस यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. लियानगेने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 18 तर कमिंदु मेंडीसने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 30 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 26 चौकार नांदविले गेले. विंडीजतर्फे मोतीने 47 धावांत 3 तर जोसेफने 39 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 38.3 षटकात 4 बाद 185 (रुदरफोर्ड नाबाद 74, चेस नाबाद 33, कार्टी 37, अथांजे 10, किंग 14, हॉप 5 अवांतर 12, हसरंगा 2-18, व्हॅन्डेरेसे 1-45, असालेंका 1-56), लंका (विजयासाठी 37 षटकात 232 धावांचे उद्दिष्ट), 31.5 षटकात 5 बाद 234 (मधूशेका 69, असालेंका 77, लियानगे नाबाद 18, कमिंदु मेंडीस नाबात 30, समर विक्रमा 18, अविष्का फर्नांडो 5, अवांतर 4, मोती 3-47, अल्झारी जोसेफ 2-39)