कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लंकेचा बांगलादेशवर थरारक विजय

06:35 AM Mar 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

असालंका सामनावीर : समरविक्रमा, कुशल मेंडीस यांची अर्धशतके, जाकेर अलीचे प्रयत्न अपुरे

Advertisement

वृत्तसंस्था/ सिलेत

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकाने यजमान बांगलादेशवर केवळ 3 धावांनी थरारक विजय मिळवून आघाडी घेतली आहे. या सामन्यात लंकेच्या चरीथ असालंकाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. असालंकाने 21 चेंडूत 6 षटकारांसह नाबाद 44 धावा झोडपल्या.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजी दिली. लंकेने 20 षटकात 3 बाद 206 धावा जमवित बांगलादेशला विजयासाठी 207 धावांचे कठीण आव्हान दिले. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 203 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ 3 धावांनी गमवावा लागला.

लंकेच्या डावामध्ये कुशल मेंडीस आणि समरविक्रमा यांनी दमदार अर्धशतके झळकवली. मेंडीसने 36 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांसह 59, समरविक्रमाने 48 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 61 तर कर्णधार असालंकाने नाबाद 44 धावा तडकावल्या. कमिंदू मेंडीसने 14 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा केल्या. सलामीचा अविष्का फर्नांडो 4 धावांवर बाद झाला. लंकेच्या डावात 19 अवांतर धावा मिळाल्या. बांगलादेशची गोलंदाजी शिस्तबद्ध नसल्याने त्यांनी 11 वाईड आणि एक नोबॉल टाकला. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 45 धावा जमविताना 2 गडी गमविले. लंकेचे पहिले अर्धशतक 43 चेंडूत, शतक 71 चेंडूत, दीडशतक 99 चेंडूत तर द्विशतक 120 चेंडूत फलकावर लागले.

कुशल मेंडीसने आपले अर्धशतक 28 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने तर समरविक्रमाने आपले अर्धशतक 43 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने झळकवले. लंकेच्या डावात 12 षटकार आणि 16 चौकार नोंदविले गेले. कुशल मेंडीस आणि समरविक्रमा यांनी तिसऱ्या गड्यासाठी 10.1 षटकात 96 धावांची भागिदारी केली. तसेच समरविक्रमा आणि कर्णधार असालंका यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 73 धावांची भागिदारी झळकवली. बांगलादेशतर्फे एस. इस्लाम, तस्किन अहमद आणि रिशाद हुसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावामध्ये जाकेर अली आणि मेहमुदुल्ला यांनी अर्धशतके नोंदविली. बांगलादेशच्या डावाची चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यूजने लिटन दासला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. त्यानंतर त्यांचे आणखी 3 गडी लवकर बाद झाले. बांगलादेशची एकवेळ स्थिती 8.5 षटकात 4 बाद 68 अशी होती. मेहमुदुल्ला आणि जाकेर अली यांनी पाचव्या गड्यासाठी 47 धावांची भागिदारी केली. मेहमुदुल्ला बाद झाल्यानंतर जाकेर अली आणि मेहदी हसन यांनी 6 व्या गड्यासाठी 65 धावांची भर घातली. मेहमुदुल्लाने 31 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 54 तर जाकेर अलीने 34 चेंडूत 6 षटकार आणि 4 चौकारांसह 68 धावा जमविल्या. कर्णधार नजमूलहुसेन शांतोने 3 चौकारांसह 20, सौम्या सरकारने 2 चौकारांसह 12, मेहदी हसनने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 11 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले.

बांगलादेशच्या डावातही 19 अवांतर धावा मिळाल्या. बांगलादेशने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 3 गडी गमविले. बांगलादेशचे पहिले अर्धशतक 40 चेंडूत, शतक 72 चेंडूत, दीडशतक 97 चेंडूत आणि द्विशतक 121 चेंडूत फलकावर लागले. मेहमुदुल्लाने 4 षटकार आणि 2 चौकारांसह 27 चेंडूत तर जाकेर अलीने 6 षटकार आणि 1 चौकारासह अर्धशतक झळकवले. लंकेतर्फे अँजेलो मॅथ्यूज, बिनुरा फर्नांडो, शनाका यांनी प्रत्येकी 2 तर महेश तिक्ष्णा आणि पथिरना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. लंकेच्या शनाकाने शेवटच्या षटकात 8 धावांच्या मोबदल्यात बांगलादेशचे 2 गडी बाद केल्याने लंकेला हा सामना 3 धावांनी जिंकता आला. आता या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी खेळविला जाणार आहे.

संक्षिप्त धावफलक - लंका 20 षटकात 3 बाद 206 (कुशल मेंडीस 59, कमिंदू मेंडीस 19, समरविक्रमा नाबाद 61, असालंका नाबाद 44, अवांतर 19, एस. इस्लाम, तस्किन अहमद आणि रिशाद हुसेन प्रत्येकी 1 बळी), बांगलादेश 20 षटकात 8 बाद 203 (मेहमुदुल्ला 54, जाकेर अली 68, नजमूलहुसेन शांतो 20, सरकार 12, मेहदी हसन 16, अवांतर 19, अँजेलो मॅथ्यूज, बिनुरा फर्नांडो, शनाका प्रत्येकी 2 बळी, थीक्षणा, पथिराना प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article