लंकेचा विंडीजवर मालिका विजय
शेवटच्या टी-20 मध्ये लंकेची 9 गड्यांनी मात, पी. निसांका ‘मालिकावीर’, कुसल मेंडीस ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / डंबुला
यजमान लंकेने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विंडीजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात लंकेने विंडीजवर 9 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. पी. निसांकाला ‘मालिकावीर’ तर कुसल मेंडीसला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 162 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 18 षटकात 1 बाद 166 धावा जमवित हा सामना 12 चेंडू बाकी ठेवून 9 गड्यांनी जिंकला. या सामन्यात कुसल मेंडीस आणि कुसल परेरा यांनी शानदार अर्धशतके झळकविली.
विंडीजच्या डावामध्ये कर्णधार पॉवेलने 27 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 37, मोतीने 15 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 32, किंगने 19 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 23 तर शेफर्डने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 18 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 8 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. पॉवेल आणि मोती यांनी सहाव्या गड्यासाठी 54 धावांची भागिदारी केली. विंडीजने पॉवरप्लेच्या 6 षटकात 42 धावा जमविताना 2 गडी गमविले. विंडीजचे अर्धशतक 51 चेंडूत, शतक 88 चेंडूत नोंदविले गेले. लंकेतर्फे थीक्षणा, हसरंगा यांनी प्रत्येकी 2 तर तुषारा, कमिंदु मेंडीस, असालेंका आणि पथीराना यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात निसांका आणि कुसल मेंडीस या सलामीच्या जोडीने 32 चेंडूत 60 धावांची भागिदारी केली. 6 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर निसांका मोतीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 22 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 39 धावा जमविल्या. यानंतर कुसल मेंडीस आणि कुसल परेरा दुसऱ्या गड्यासाठी 12.4 षटकात अभेद्य 106 धावांची शतकी भागिदारी करत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कुसल मेंडीसने 50 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 68 तर कुसल परेराने 36 चेंडूत 7 चौकारांसह नाबाद 55 धावा झळकविल्या. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 67 धावा जमविताना 1 गडी गमविला. मेंडीसने 37 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह तर कुसल परेराने 34 चेंडूत 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. 10 षटकाअखेर लंकेने 1 बाद 100 धावा जमविल्या होत्या. विंडीजतर्फे मोतीने 31 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: विंडीज 20 षटकात 8 बाद 162- (पॉवेल 37, मोती 32, किंग 23, होप 18, शेफर्ड 18, अवांतर 14, थीक्षणा आणि हसरंगा प्रत्येकी 2 बळी, तुषारा, कमिंदु मेंडीस, असालेंका आणि पथीराना प्रत्येकी 1 बळी), लंका 18 षटकात 1 बाद 166 -(पी. निसांका 39, कुसल मेंडीस नाबाद 68, कुसल परेरा नाबाद 55, अवांतर 4, मोती 1-31)