लंकेचा भेदक मारा, लाहिरु कुमाराचे 2 बळी
पहिली कसोटी पहिला दिवस : द.आफ्रिका 4 बाद 80, पावसाच्या व्यत्ययाने 21 षटकांचा खेळ
वृत्तसंस्था/दरबान, द.आफ्रिका
यजमान द.आफ्रिका व लंका यांच्यात येथे सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे केवळ 21 षटकांचा खेळ होऊ शकला. या खेळात लंकेच्या भेदक गोलंदाजीपुढे यजमानांची स्थिती 20.4 षटकांत 4 बाद 80 अशी झाली होती. पावसाळी हवामान असल्यामुळे लंकेने नाणेफेक जिंकल्यानंतर द.आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली आणि त्यांच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरविताना चौथ्याच षटकात द.आफ्रिकेची स्थिती 2 बाद 14 अशी केली. असिता फर्नांडोने एडन मार्करमला (9) एका आऊटस्विंग कटरवर स्लिप क्षेत्रात मॅथ्यूजकरवी झेलबाद केल्यानंतर विश्वा फर्नांडोने टोनी डी झॉर्झीलाही (4) त्याच पद्धतीने बाद केले. लाहिरु कुमाराने वेग, लेंग्थमधील वैविध्यावर प्रथम ट्रिस्टन स्टब्सला 16 धावांवर करुणारत्नेकरवी झेलबाद केले व नंतर डेव्हिड बेडिंगहॅमला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केले. डेव्हिडने 4 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका प.डाव 20.4 षटकांत 4 बाद 80 : मार्करम 9, डी झॉर्झी 4, स्टब्स 3 चौकारांसह 16, बवुमा खेळत आहे 47 चेंडूत 5 चौकारांसह 28, बेडिंगहॅम 4, व्हेरेन खेळत आहे 16 चेंडूत 9, अवांतर 10. लाहिरु कुमारा 2-35, असिता फर्नांडो 1-22, विश्वा फर्नांडो 1-17.