‘आयसीसी’ मासिक पुरस्कारांवर श्रीलंकेची छाप
दुनिथ वेललागे, हर्षिता समरविक्रमा यांची निवड
वृत्तसंस्था/ दुबई
श्रीलंकेचे खेळाडू दुनिथ वेललागे आणि हर्षिता समरविक्रमा यांना सोमवारी ऑगस्ट, 2024 मधील ‘आयसीसी प्लेयर्स ऑफ द मंथ’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. श्रीलंकेला मिळालेला हा दुर्मिळ दुहेरी सन्मान आहे. वेललागेने भारताविऊद्धच्या स्वगृही झालेल्या वनडे मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर समरविक्रमाने आयर्लंडच्या दौऱ्यावर छाप उमटविली होती.
एकाच महिन्यात एकाच देशातील खेळाडूंनी हा पुरस्कार जिंकण्याचे एकमेव उदाहरण म्हणजे जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना यांचे असून यावर्षी जूनमध्ये महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती. वेललागेने दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज आणि वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्स यांना मागे टाकून हा प्रतिष्ठित मासिक पुरस्कार जिंकला.
वेललागेने भारताविरुद्धच्या मालिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करून 2-0 अशी मालिका जिंकण्यास मदत केली होती तसेच तो मालिकावीर ठरला होता. त्याच्या जोरावर हा पुरस्कार त्याने जिंकला. आहे. या 31 वर्षीय डावखुऱ्या खेळाडूने त्यात नाबाद 67, 39 आणि 2 धावा केल्या आणि तिसऱ्या सामन्यातील 27 धावांत 5 बळींसह मालिकेत सात बळी मिळविले. श्रीलंकेच्या पुरुष खेळाडूने हा पुरस्कार जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी अँजेलो मॅथ्यूज (मे, 2022), प्रभात जयसूर्या (जुलै, 2022), वानिंदू हसरंगा (जून, 2023) आणि कामिंदू मेंडिस (मार्च, 2024) यांनी तो मिळविलेला आहे.
समरविक्रमाने आयर्लंडच्या दौऱ्यावर चांगली धावसंख्या उभारताना वनडेमध्ये शतक झळकावणारी श्रीलंकेची तिसरी महिला क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिळविला होता. या 26 वर्षीय डावखुऱ्या खेळाडूने डब्लिनमध्ये खेळल्या गेलेल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये 169.66 च्या स्ट्राइक रेटने 151 धावा, तर बेलफास्टमधील तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये 82.69 च्या स्ट्राइक रेटने 172 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यात तिने 105 धावा केल्या होत्या. समरविक्रमा ही आयसीसीचा महिला खेळाडूंसाठीचा मासिक पुरस्कार जिंकणारी श्रीलंकेची दुसरी खेळाडू आहे.