तिरंगी मालिकेत लंकेचा पहिला विजय
झिम्बाब्वेवर 9 गड्यांनी मात, पथुम निसांका सामनावीर
वृत्तसंस्था/ रावळपिंडी, पाकिस्तान
सलामीवीर पथुम निसांकाने 58 चेंडूत फटकावलेल्या नाबाद 98 धावांच्या बळावर लंकेने येथे झालेल्या तिरंगी मालिकेत पहिला विजय मिळविताना झिम्बाब्वेचा 9 गड्यांनी पराभव केला. सामनावीरचा बहुमान मिळविलेल्या निसांकाने धुवाधार टोलेबाजी करीत 11 चौकार, 4 षटकार तडकावताना टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविताना कुसल परेराचा विक्रम मागे टाकला. तो आता लंकेचा या प्रकारातील सर्वाधिक धावा जमविणारा फलंदाज बनला आहे.
निसांकाने केलेल्या दणकेबाज फलंदाजीमुळे लंकेने झिम्बाब्वेने दिलेले 147 धावांचे आव्हान केवळ एका गड्याच्या मोबदल्यात 22 चेंडू शिल्लक ठेवत पार केले. झिम्बाब्वेने निर्धारित षटकांत 5 बाद 146 धावा जमविल्या होत्या. शनिवारी होणाऱ्या अंतिम फेरीत पाकिस्तानने याआधीच पात्रता मिळविली आहे. लंकेला अंतिम फेरी गाठण्यासाठी गुरुवारी पाकिस्तानविरुद्ध होणारा सामना जिंकावा लागणार आहे. अन्यथा सरस नेटरनरेट असल्याने झिम्बाब्वे अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
निसांका व कुसल मेंडिस (नाबाद 25) यांनी 64 चेंडूत 89 धावांची अभेद्य भागीदारी करून 17 व्या षटकात विजय साकार केला. झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करीत 20 षटकांत 5 बाद 145 धावा जमविल्या. ब्रायन बेनेटने 34, सिकंदर रझा व रेयान बर्टने प्रत्येकी 37 धावा जमविल्या. लंकेच्या वनिंदू हसरंगा व महीश थीक्षाणाने प्रत्येकी 2 बळी टिपले.
पथुम निसांकाने आतापर्यंत 77 टी-20 सामन्यांत 2326 धावा 32.30 च्या सरासरीने व 126.89 च्या स्ट्राईक रेटने जमविल्या असून त्यात 18 अर्धशतके व एका शतकाचा समावेश आहे. याआधी कुसल परेराने 91 सामन्यांत 2305 धावा जमविल्या होत्या.